क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनी सामाजिक क्षेत्रात काम करताना पर्यावरण, महिला सक्षमीकरण व शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार आहे. कंपनीने अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून विविध प्रकारच्या इंधनाची ३० ते ४० टक्के बचत केली आहे. पाणीबचतीसाठी शेततळे व पाऊस पाणी संकलनाचे प्रयोगही राबवले आहेत.
कंपनीचे सरव्यवस्थापक विजय लेले यांनी ही माहिती दिली. २८व्या क्रॉम्प्टन करंडक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कंपनीने दत्तक घेतलेल्या हिंगणगावमधील (ता. नगर) ७० महिलांना एमआयडीसी क्षेत्रात रोजगार मिळवून दिला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने कंपनीच्या आवारात १ हजार ३०० वृक्षांची व परिसरात २५० वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासना सुरू केली आहे. लगतच्याच ६ एकर परिसरातील, आग लागण्याची शक्यता असलेले वेडय़ा बाभळींचे जंगल स्वच्छ करून तेथे ४० लाख लीटर क्षमतेचे शेततळे निर्माण केले आहे. या शेततळय़ातून लागवड केलेल्या रोपांना ठिबक पद्धतीने पाणी दिले जात आहे.
कंपनीच्या उत्पादनासाठी पूर्वी लाकडाचा वापर केला जात होता, त्याऐवजी आता ‘फॅब्रिक कोटेड पॅकिंग’ वापरण्यास सुरुवात केल्याने लाकडाची मोठी बचत झाली. कंपनीच्या उपाहारगृहातील अस्वच्छ अन्न व कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती सुरू केली आहे, त्यामुळे उपाहारगृहात लागणारा रोजचा ४० किलो एलपीजी गॅसची बचत झाली आहे. काही कचऱ्यापासून विटा तयार करून त्यांचा वापर उत्पादनातील डायकास्टिंग मशीनसाठी केला जात आहे, त्यामुळेही ४० टक्के गॅसची बचत झाली आहे. कंपनीच्या कार्यालयासाठी सौरऊर्जेचा वापर सुरू केल्याने ३० टक्के वीज बचत झाल्याचे लेले यांनी सांगितले. पाऊस संकलनातून ३ लाख लीटर पाणी जमा करण्यात आले.
दत्तक घेतलेल्या हिंगणगावमध्ये शिक्षण व स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत, गावकऱ्यांसाठी व्यायामशाळाही उभारली. अकोल्याच्या आश्रमशाळेतील ४ मुले दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला जात आहे, तसेच तेथील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विशेष कोचिंग घेतले जाते, त्यामुळे दरवर्षी ८० टक्के विद्यार्थी इंजिनिअरिंग व वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवडले जातात, असेही त्यांनी सांगितले. कंपनीचे कर्मचारी वर्गणी करून केडगावच्या सावली संस्थेतील मुलांसाठी दरमहा किराणा देतात. कंपनीने सावेडीतील आकांक्षा अपंग संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वाहन, रांजणी, रेणुकानगर, विळद येथील शाळेला बाके, राहुरीतील अनाथालयाला व पाथर्डीतील गोशाळेला प्रत्येकी अडीच लाखांचे जनरेटर देणगी म्हणून दिले आहे.
जागतिक महत्त्वाकांक्षा
मोटार उद्योग क्षेत्रात सध्या जागतिक बाजारपेठेत चीन आघाडीवर आहे. ही बाजारपेठ काबीज करण्याची धोरणे क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीने राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रथम युरोपवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मोटार उत्पादनात सध्या अधिक क्षमतेचे ‘आयई-४’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कंपनीच्या कांजूर (मुंबई) प्रकल्पात संशोधन सुरू आहे, त्या आधारावर क्रॉप्टन येत्या दोन ते तीन वर्षांतच जागतिक बाजारपेठेत चीनला मागे टाकेल, असा विश्वास सरव्यवस्थापक लेले यांनी व्यक्त केला.