ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
इरई, वर्धा, झरपट व वैनगंगा नदीला पूर आल्याने या जिल्ह्य़ातील १२ हजार हेक्टर क्षेत्रातील भात, सोयाबीन, कापूस, तूर व भाजीपाला वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत. आठ तालुक्यातील भाताचे बियाणे वाहून गेल्याने शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली असून दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. दरम्यान, नुकसानीचा आकडा २० हजार हेक्टरच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी समोर आली आहे.    
या जिल्ह्य़ात ४० दिवसात सरासरी ७५० मि.मी. पाऊस झाल्याने इरई, वर्धा, झरपट व वैनगंगा या चार प्रमुख नद्यांना पूर आला. त्यात इरई धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आल्याने नदी काठावरील शेती सलग तीन दिवस पाण्याखाली राहिल्याने सोयाबीन, कापूस व भाताचे पीक वाहून गेले. पुराचा सर्वाधिक फटका ब्रम्हपुरी, भद्रावती, वरोरा, मूल, चिमूर, सिंदेवाही, चंद्रपूर, बल्लारपूर, राजूरा व गोंडपिंपरी तालुक्यांना बसला आहे. या आठही तालुक्यातील अख्ख्ये पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने प्राथमिक सर्वेक्षणात जवळपास १२ हजार हेक्टर क्षेत्रातील पीक वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार ५० टक्क्यांवर नुकसान झालेल्या पिकांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. सोयाबीनचे २ हजार ७०३ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ भाताचे २ हजार १८३ हेक्टर, कापूस ४६९ हेक्टर, तूर ११९ हेक्टर व भाजीपाला ०.५ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे, तर ५० टक्क्यांपेक्षा कमी क्षेत्रातील नुकसानीत भात पीक २ हजार ७७८ हेक्टर, कापूस ४४८ हेक्टर, सोयाबीन २ हजार ११८ हेक्टर व तुरीचे १८२ हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. २००६ च्या पुरानंतर शेतीचे एवढय़ा प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
ब्रम्हपुरी, सिंदेवाही, वरोरा, चिमूर व मूल या पाच तालुक्यात तर भाताचे अख्खे पीक बियाणांसह वाहून गेल्यामुळे नुकसानीचा हा आकडा कोटय़वधीच्या घरात आहे. हीच परिस्थिती चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातही आहे. शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता प्रभारी जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक बनसोडे यांना तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. या सर्वेक्षणाच्या प्राथमिक अहवालानुसार वरील आकडेवारी समोर आली आहे. मात्र, नुकसानीचा हा आकडा २० हजार हेक्टरच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच तालुका कृषी अधिकाऱ्यांना तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कृषी विभाग कामाला लागला असला तरी आज तिसऱ्याही दिवशी शेतात पुराचे पाणी असल्याने नुकसानीचा आकडा वाढणार असल्याचे परिस्थितीवरून दिसून येते. शेतकऱ्यांची एवढी प्रचंड हानी झाली असल्याने आठ तालुक्यात दुबार पेरणीचे संकट आहे. भात, सोयाबीन व कपाशीची दुबार पेरणी करावीच लागणार आहे. अन्यथा, शेतकऱ्यांच्या हातात यावर्षी काहीच लागणार नाही, असे जाणकारांचे मत आहे. दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. या जिल्ह्य़ात भात व सोयाबीन हे महत्वाचे पीक असून याच पिकांच्या बियाणांची टंचाई निर्माण झाली आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात पूर येईल, याचा अंदाज न आल्यानेच हे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नदी काठच्या दाताळा, खुटाळा, भटाळी, किटाळी, नांदगाव, माना, आरवट, चारवट, हडस्ती, लखमापूर, पदमापूर, मासळ, नेरी, कोसारा, मारडा, शिवनी, वढा, बेलसनी, पांढरकवडा, भोयेगाव, पिंपरी या गावातील पीक वाहून गेले आहे.
काही गावातील अख्खी शेतीच्या शेती वाहून गेल्याने ग्रामीण भागातील चित्र भयावह आहे. अशातही आमदार व खासदारांकडून ओल्या दुष्काळाची मागणी समोर न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी कुणीच उभे राहात नाही, अशी ओरड आता शेतकरी करत आहेत.