नागपूर विभागातील पिके नासली
नागपूर विभागात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची वाढ खुंटली असून सोयाबीन, कापूस, तूर व धान पिकांवर कीडींचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. अतिवृष्टीने कोलमडून गेलेल्या शेतक ऱ्यांसमोर आता राहिलेले पीक कीडींपासून वाचविण्याचे नवे संकट उभे ठाकले आहे.
विभागात खरिपाच्या १८ लाख, ५८ हजार, ९०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली. विभागात यावर्षी १०१ टक्के पेरणी आटोपली असली तरी अतिवृष्टीमुळे ४ लाख, ९४ हजार, २६६ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्य़ात ६१ हजार,४३४, नागपूर १ लाख, ५१ हजार, ६५५, भंडारा २९ हजार ७७७, गोंदिया २४ हजार ६९५, चंद्रपूर २ लाख, ६३०, गडचिरोली ३५ हजार ७२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या अडीच महिन्यापासून विभागात जोरदार पाऊस होत असल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांनी अर्धी उंचीही गाठलेली नाही. ढगाळ वातावरण आणि भिजलेली जमीन यामुळे कापूस, सोयाबीन, तूर ही पिके पिवळी पडली आहेत. अशाही परिस्थितीत जी पिके तग धरून आहेत, त्या पिकांवर आता कीडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागपूर जिल्ह्य़ातील कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तुरीवर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात कापसावर पांढरी माशी, तुडतुडे, सोयाबीनवर तंबाखूची पाने खाणारी अळी, उंटअळी व चंक्रभूंगा या कीडींचा प्रादुर्भाव झाला आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या धान पट्टय़ात खोडकीड, लष्करी अळी व पाने खाणाऱ्या अळीचा प्रकोप आहे. धान पीक सध्या फुटव्यांच्या अवस्थेत आहे. कीडीचा प्रादुर्भाव होत असल्याने धानाच्या ताटांची संख्या कमी होऊन त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. देवधानाची रोपटीदेखील धानाच्या वाढीसाठी घातक आहेत.
सतत ढगाळ वातावरणाचा जोर कायम राहिल्यास संपूर्ण पिके कीडीच्या  विळख्यात सापडण्याचा इशारा कृषीतज्ज्ञांनी दिला आहे. अतिवृष्टीचा तडाखा बसलेला शेतकरी नव्या संकटामुळे कोलमडला असून पिकांवरील कीडींच्या नायनाटासाठी अतिरिक्त खर्च करणे आता भाग पडत आहे.  विभागात चालू महिन्यात २० तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्य़ातील ८, गडचिरोली ७, भंडारा ३, नागपूर व गोंदिया जिल्ह्य़ांतील प्रत्येकी एका तालुक्याचा समावेश आहे. या महिन्यात सर्वाधिक पाऊस भंडारा जिल्ह्य़ात ३७७ मि.मी. झाला आहे. गडचिरोली ३६३, चंद्रपूर २५३, नागपूर २१५ व वर्धा जिल्ह्य़ात ११५ मि.मी. पाऊस झाला.