News Flash

ग्रामीणमध्ये शिवसेनेचे सर्वात ‘गरीब’ उमेदवार, समीर मेघे सर्वाधिक श्रीमंत

विधानसभेच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या उमेदवारांनी शपथपत्र सादर केले. त्यात बहुतांश उमेदवार कोटय़धीश असल्याचे शपथपत्रावर नजर टाकली असता दिसून येत आहे. तर काहींच्या संपत्तीत गेल्या पाच-दहा

| September 30, 2014 08:05 am

विधानसभेच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या उमेदवारांनी शपथपत्र सादर केले. त्यात बहुतांश उमेदवार कोटय़धीश असल्याचे शपथपत्रावर नजर टाकली असता दिसून येत आहे. तर काहींच्या संपत्तीत गेल्या पाच-दहा वर्षांत प्रचंड वाढ झाल्याचेही दिसून येते. विशेषत: आजी माजी आमदारांसोबतच काही नव्यानेच उमेदवारी दाखल केलेले उमेदवारही कोटय़धीश असल्याचे दिसून येत आहे. फार कमी उमेदवार लाखाच्या आतच खेळत असल्याचेही स्पष्ट होत आहे.
काटोलमधून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक रिंगणात असलेले व गेल्या पंधरा वर्षांंपासून सत्तेच्या वर्तुळात असलेले अनिल देशमुख हे तब्बल ७ कोटी ५६ लाख २३ हजार ७४५ रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. २००४ मध्ये त्यांच्याकडे २ कोटी १७ लाख २१ हजार ७६९ रुपये किंमतीची संपत्ती होती. गेल्या दहा वर्षांत त्यांच्या संपत्तीत ५ कोटी ३९ लाखाने वाढ झाल्याचे दिसून येते. एवढी संपत्ती असताना त्यांच्याकडे एकही गाडी नसल्याचा उल्लेख शपथपत्रात केला आहे. भाजपचे उमेदवार आशिष रणजित देशमुख हे सुद्धा कोटय़धीश आहेत. स्वत: शेतकरी व व्यावसायिक असलेले देशमुख हे ३ कोटी ६० लाख ९४ लाख रुपये किंमत असलेल्या संपत्तीचे मालक आहेत. २०१३-१४ या वर्षीचे त्यांचे उत्त्पन्न ३ लाख ५८ हजार ४३७ रुपये एवढे आहे. शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र हरणे यांच्याकडे फक्त १२ लाख ३३ हजार १४८ रुपये किंमत असलेली चल-अचल संपत्ती आहे. त्यातही ४ लाख ४६ हजार रुपये कर्ज आहे. घर बांधकाम आणि कार खरेदी करण्यासाठी हे कर्ज घेतल्याचा उल्लेख त्यांनी शपथपत्रात केला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार राहुल वीरेंद्र देशमुख यांच्याकडे १ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांची संपत्ती आहे. तर १६ लाख ५० हजार रुपये कर्ज आहे.
सावनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे रिंगणात असलेले विद्यमान आमदार सुनील केदार यांचे २०१३-१४ या वर्षांचे उत्पन्न फक्त ५ लाख ६४ हजार ३३५ रुपये एवढे आहे. त्यांच्याकडे ४५ लाख ५९ हजार ४२५ रुपयाची संपत्ती आहे. तर ७८ हजार ६६५ रुपयांचे शेअर्स आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावे १ कोटी १६ लाख ५५ हजार २१० रुपये किंमतीची संपत्ती असल्याचा उल्लेख शपथपत्रात करण्यात आला आहे. तर भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांच्याकडे २ कोटी २३ लाख १९ हजार रुपयांची संपत्ती आहे. तर ४५ लाखाचे कर्ज असल्याचेही त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे.
हिंगणा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी मंत्री रमेश बंग यांच्याकडे ५ कोटी २२ लाख ३० हजार रुपये किंमतीची संपत्ती आहे. २००४ मध्ये त्यांच्याकडे फक्त २ कोटींची संपत्ती होती. २२ लाख कर्ज असल्याचा उल्लेखही शपथपत्रात आहे. त्यांच्याकडे ४.०५ हेक्टर जमीन असून त्याची किमंतच ३ कोटी २४ लाख रुपये आहे. शिवसेनेतर्फे रिंगणात असलेले माजी खासदार प्रकाश जाधव यांच्याकडे २ कोटी ४० लाख रुपये किंमतीची संपत्ती असली तरी रोख रक्कम फक्त २१ हजार १५१ रुपये आहे. भाजपतर्फे दंड ठोकून असलेले समीर मेघे यांच्या स्वत:च्या मालकीची १७ कोटी ७५ लाख ९१ हजार ३३० रुपये किंमतीची संपत्ती आहे. परंतु १० कोटी २६ लाख ७० हजार ६९८ रुपयाचे कर्ज आहे. रोख रक्कम फक्त ७ लाख १५ हजार ६४४ रुपये एवढे असल्याचा उल्लेख त्यांनी शपथपत्रात केला आहे.
उमरेड मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांनीही कोटीच्यावर उड्डाण केले आहे. २० हजार रुपये रोख असलेल्या पारवे यांची एकूण संपत्तीची किंमत १ कोटी ८८ लाख रुपये आहे. तर पत्नीच्या नावानेही १ कोटी ०६ लाख ६७ हजार रुपये किंमतीची संपत्ती आहे. काँग्रेसचे उमेदवार महादेव कचरू नगराळे यांच्याकडे फक्त १० लाखाची संपत्ती आहे. तर ४० हजार रुपये रोख आहे. ते प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. पत्नीच्या नावाने मात्र २ कोटींची संपत्ती असल्याचा त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात उल्लेख आहे. कोणतेच कर्ज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. स्वतंत्र म्हणून मैदानात असलेले राजू पारवे हे एका पेट्रोल पंपचे मालक आहे. तसेच ऑटो मोबाईलचा त्यांचा व्यवसाय आहे. सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे पारवे यांच्या संपत्तीचे मूल्य १ कोटी ७५ लाख रुपये आहे. शिवसेनेचे उमेदवार ज.मो. अभ्यंकर हे सुद्धा ५ कोटी ५० लाख रुपये किंमत असलेल्या संपत्तीचे मालक आहे. १९ लाख रुपये कर्ज घेतले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  
कामठी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्याकडे एकूण ३ कोटी ४६ लाख २४ हजार ११० हजार रुपये किंमतीची चल-अचल संपत्ती आहे. तर ३७ लाख रुपये कर्ज असल्याचा उल्लेखही त्यांनी शपथपत्रात केला आहे. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचे २०१३-१४ या वर्षांचे उत्पन्न फक्त ६३ हजार रुपये आहे. त्यांच्या नावाने १ कोटी २७ लाख ०३ हजार रुपयाची संपत्ती आहे. तर पत्नीच्या नावाने ५ कोटी ०६ लाख ४८ हजार रुपयांची संपत्ती आहे. १८ लाख ४५ हजार ९७१ रुपये कर्ज आहे. सेनेतर्फे रिंगणात असलेले तापेश्वर वैद्य हे मात्र इतर उमेदवारांच्या तुलनेत गरीब दिसून येत आहे. त्यांच्याकडे फक्त ६० लाख रुपये किंमतीची संपत्ती असून १५ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे सध्या फक्त ५० हजार रुपये रोख रक्कम आहे.
रामटेक विधानसभा मतदारसंघातून रिंगणात असलेले काँग्रेसचे उमेदवार सुबोध मोहिते हे ४ कोटी ९३ लाख ४० हजार रुपये किंमत असलेल्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्यावर ६१ लाख ०९ हजार रुपये कर्ज आहे. पाच वर्षांपूर्वी याच मतदारसंघातून निवडणूक हरल्यानंतरही त्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते. भाजपचे उमेदवार मल्लीकार्जून रेड्डी यांच्याकडे ३ कोटी ५३ लाख २५ हजार १५० रुपये किंमतीची संपत्ती आहे. व्यावसायिक असलेले रेड्डी हे मूळचे आंध्रप्रदेशातील रामदुर्गम, जिल्हा-अनंतपूर येथील रहिवासी आहे. येथील ज्युनिअर कॉलेजमधून ते इयत्ता सातवी उत्तीर्ण झाल्याचा उल्लेख त्यांनी शपथपत्रात केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल रणजित देशमुख हे ४ कोटी ९४ लाख ४१ हजार ६८० रुपये किंमतीच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्याकडे ६ कोटी ६९ लाख ६६ हजार ७६४ रुपयांचे कर्ज आहे. त्यातील ५ लाख ७६ लाख ७५ हजार रुपयाचे कर्ज त्यांनी आपले वडील रणजित देशमुख यांच्याकडून घेतल्याचा उल्लेख शपथपत्रात केला आहे. आपल्याकडे फक्त १ लाख ४५ हजार ८९० रुपये रोख रक्कम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांच्याकडे १ कोटी २३ लाख २० हजार रुपयांची संपत्ती आहे. तर १६ लाख ६१ हजार ६६७ रुपयाचे कर्ज आहे. सध्या मात्र रोख ४० हजार रुपये असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 8:05 am

Web Title: crorepati candidates in nagpur
टॅग : Maharashtra,Nagpur
Next Stories
1 विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यासाठी सात हजार पोलिसांची शहरावर करडी नजर
2 पळवापळवीचा रंगलेला सामना अन् मतदारांचे मनोरंजन
3 २१व्या शतकात विद्यापीठ हे ज्ञानासाठी ऊर्जा पुरविणारे घर- डॉ. एपीजे अब्दुल कलाम
Just Now!
X