औद्योगिक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची निकड लक्षात घेऊन त्या गरजेशी सुसंगत मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी खासगी उद्योगांच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या दर्जावाढ करण्याच्या प्रक्रियेत उत्तर महाराष्ट्रातील तीन संस्थांची निवड झाली आहे. या उपक्रमासाठी यंदा राज्यातील एकूण ४१ संस्थांची निवड झाली असून त्यांना प्रत्येकी अडीच कोटी रुपयांचा निधी कर्जाऊ स्वरूपात देण्यात आला आहे. नाशिक व जळगाव जिल्ह्यातील संस्थांना यादीत स्थान मिळाले असले तरी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकाही संस्थेचा त्यात समावेश नाही.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून दिले जाणारे प्रशिक्षण कारखान्यातील तंत्रज्ञानाशी सुसंगत करणे आणि कौशल्यपूर्वक जागतिक दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी कारखाने, औद्योगिक संघटना यांच्या सहकार्याने केंद्र शासनाने देशातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा दर्जा उंचावून त्यांना ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये रूपांतरित करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या माध्यमातून देशातील १३९६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा दर्जावाढ केली जात आहे. त्या योजनेत राज्यातील २०६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा समावेश आहे. २००७ पासून सुरू असलेल्या या प्रक्रियेत यंदा ४१ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा दर्जावाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत संस्था व्यवस्थापन समितीला अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. ही रक्कम व्याजमुक्त कर्जरूपाने देण्यात येते. खासगी उद्योगांच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या योजनेत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल व चोपडा या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची निवड झाली आहे.
या निधीचा विनियोग प्रशिक्षण संस्थांमध्ये सध्या सुरू असलेल्या मूळ व्यवसाय अभ्यासक्रमाचा विकास करण्यासाठी वापरता येणार आहे. संस्था विकास आराखडय़ानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘आयएमसी’ला नवीन व्यवसाय अथवा तुकडी सुरू करावयाची असल्यास आवश्यकतेनुसार करार तत्त्वावर शिक्षक पदे नेमता येणार आहेत. यासाठीचा खर्च योजनेच्या उपलब्ध निधीतून भागविता येईल.