दिवाळीच्या पर्वावर विविध प्रकारच्या फुलांची मागणी वाढते. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे फुलझाडांची मोठय़ा प्रमाणात नासाडी झाल्याने बाजारात फुलांची आवक कमी झाली आहे. किंमतीतही वाढ झाली आहे. तरीही दिवाळीच्या काळात विदर्भात किमान चार ते पाच कोटीची उलाढाल अपेक्षित फुल विक्रेत्यांनी व्यक्त केला.
सीताबर्डीमधील नेताजी मार्केटमधील फुलांच्या बाजारात दसऱ्यानंतर फुलांची आवक कमी झाल्यामुळे भाव चांगलेच भडकले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत फुलांचे भाव १५ ते२० टक्क्क्यांनी वाढले आहे. विदर्भ फुल विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय वेखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी अतिवृष्टीमुळे झेंडूसह गुलाब, शेवंती फुलांची नासाडी झाली आहे. विदर्भातील शेतक ऱ्यांकडून फुलांची आवक घटली आहे. बाजारात मुंबई, पुण्यासह, कोलकाता, हैदराबाद, बैतुल आणि बंगलोरमधून मोठय़ा प्रमाणात माल आला आहे.
भंडारा, गोंदिया, अमरावती आणि नागपूर जिल्ह्य़ात फुलशेती करणारे आहेत मात्र त्यांच्याकडे अतिवृष्टीमुळे फुलांची हानी झाल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात माल मिळालेला नाही. रविवारी लक्ष्मीपूजन असल्यामुळे या दिवशी फुलांची मोठय़ा प्रमाणात मागणी राहील. अनेक चिल्लर विक्रेत्यांनी तर आगाऊ मागणी केली आहे. यंदा शेवंती व झेंडूच्या फुलांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलेच वाढले असले तरी मागणीत घट झालेली नाही. फुले कितीही महाग झाली तरी त्याची खरेदी मोठय़ा प्रमाणावर केली जात आहे. फुलांचे मार्केट वाढले आहे. जिल्ह्य़ातील अनेक फुल विक्रेते नागपुरात येऊ लागल्यामुळे विक्रेत्यांची संख्या वाढल्यामुळे जागा कमी पडायला लागली आहे. दिवाळीदरम्यान दररोज २५ ते ३० ट्रक माल येत असल्याचे वेखंडे यांनी सांगितले.
 दिल्ली, कोलकाता, हैद्राबाद येथूनही मोठय़ा प्रमाणात फुले येत असून त्यात पांढरा गुलाब, टोरो, जरबेरा या फुलांचा समावेश आहे. साधारणत गणेशोत्सवापासून शेवंती व झेंडूची आवक सुरू होते. गुलाब, अष्टर व गुलछडीचीही आवक यावेळी चांगली आहे. झेंडूची विक्री १०० ते १२० रुपये किलोप्रमाणे तर अष्टर, जरबेरा या फुलांची अनुक्रमे ८० ते ९० व १०० ते १२०रुपये किलोप्रमाणे विक्री सुरू आहे. टोरो गुलाबाची २५ फुले २०० रुपयांना विकली जात आहेत. फुलांचे भाव तिप्पट असले तरी काही नागरिक किमतीचा विचार न करता फुलांची खरेदी करीत असतात. शेवंतीच्या राजा वाणाला ९०-१०० रुपये किलो भाव असून, अष्टर १०० रुपये, झेंडू (कोलकाता वाण)८० ते ९० रुपये, गावरान झेंडू ३० चे ४० रुपये, रतलाम (झावरा) ५० चे ६० रुपये, तर गलांडा ६० ते ८० रुपये किलो भाव आहे. दिवाळीची धूम, उत्सवाचे वातावरण आणि खरेदीची धूम यामुळे फुलांचा बाजार सध्या दरवळून गेला आहे.