आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविकांच्या जनसागराचे व्यवस्थापन हे सर्वात खडतर आव्हान असल्याचे लक्षात घेत पोलीस आयुक्तालयाने हाज यात्रेत गर्दीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणाऱ्या ‘ब्युरो हॅपोल्ड’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्थेची मदत घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत. हाज यात्रेदरम्यान अनेकदा चेंगराचेंगरीच्या दुर्घटना होऊन शेकडो जणांना प्राण गमवावे लागले होते. ‘ब्युरो हॅपोल्ड’ने तेथील गर्दीच्या व्यवस्थापनाचे काम हाती घेतल्यानंतर तसा प्रकार घडलेला नाही. कुंभमेळ्यात गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी या संस्थेच्या अनुभवाचा उपयोग करण्याचा पोलिसांचा मानस असून ‘ब्युरो हॅपोल्ड’नेही मार्गदर्शनाची तयारी दर्शविली आहे.
मागील सिंहस्थात शाही मिरवणुकीवेळी चेंगराचेंगरी होऊन ३४ भाविकांना प्राण गमवावे लागले होते. शहराच्या मध्यवस्तीत भरणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळ्यासमोर अतिशय कमी उपलब्ध असलेली जागा ही न सोडविता येणारी समस्या आहे. पर्वणीच्या दिवशी गोदावरी पात्रात रामकुंड या एकाच परिसरात स्नानासाठी भाविकांची गर्दी उसळले. मध्यवस्तीतील नदीच्या पात्राकडे येणारे-जाणारे मार्ग एकच आहेत. यामुळे स्नानासाठी आलेले व स्नान करून जाणाऱ्या भाविकांची कोंडी टाळणे अवघड बनते. तसेच घाटाकडे अर्थात पात्राकडे येणारे सर्व मार्ग अतिशय अरुंद असल्याने लाखो भाविकांच्या सहभागामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता बळावते. गतवेळच्या सिंहस्थात गर्दीच्या व्यवस्थापनात काही त्रुटी राहिल्याने चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले होते. आगामी सिंहस्थात किती भाविक येणार याची आकडेवारी निश्चित नाही. गतवेळी ५० लाख भाविकांनी सहभाग नोंदविल्याचा संदर्भ घेऊन त्यात आणखी वाढ होईल हा अंदाज बांधून शासकीय यंत्रणा काम करत आहे. त्यात यंदा नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या शाही स्नानाच्या दोन तिथी एकाच दिवशी येत असल्याने उपरोक्त दिवशी लाखो भाविक दोन्ही ठिकाणी स्नानांचा अपूर्व योग साधण्याचा प्रयत्न करतील. यामुळे उपरोक्त काळात ये-जा करणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन आणि जागेची मर्यादा हे प्रशासनासमोरील मुख्य आव्हान आहे.
या विषयाचे गांभीर्य इतर शासकीय विभागांनी लक्षात घेतले नसले तरी शहर पोलीस आयुक्तालयाने मात्र आपापल्यापरीने प्रयत्न सुरू केले आहे. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्थेचे मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न हा त्याचाच एक भाग. सिंहस्थात गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस आयुक्तालय कार्यालयाने लंडनस्थित ब्युरो हॅपोल्ड या अभियांत्रिकी क्षेत्रातील सल्लागार संस्थेशी संपर्क साधला आहे. मक्का मदिना येथील हाज यात्रेबरोबर या संस्थेचे ‘क्राऊड फ्लो सोल्युशन’ लंडन ऑलिम्पिक २०१२, बार्सिलोना रेल्वेस्थानक, मिलेनियम डोम, लॉर्ड्स क्रिकेट मैदान आदींसह जगातील अनेक शहरांचे नियोजन, विमानतळ, बसस्थानक आदी अफाट गर्दीच्या ठिकाणी वापरण्यात आले आहे. एखाद्या परिसरात गर्दीचे व्यवस्थापन कसे करता येईल, याचा सखोल अभ्यास करून संस्थेमार्फत उपाय सुचविले जातात. मार्गदर्शन केले जाते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात या संदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी उपरोक्त संस्थेशी दोन वेळा ‘ऑनलाइन’ चर्चा झाली आहे. त्यांनी गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मदतीची तयारी दर्शविली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ब्युरो हॅपोल्ड संस्थेशी संपर्क साधण्यात आला आहे. मक्का मदिना येथील हाज यात्रेतील प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन ही संस्था करते. या संस्थेच्या अनुभवाचा उपयोग सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दीचे व्यवस्थापन करताना व्हावा यासाठी आतापर्यंत दोन वेळा या संस्थेशी चर्चा झाली आहे. संस्थेने मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविली आहे.
    – कुलवंतकुमार सरंगल,
    पोलीस आयुक्त, नाशिक