तीळ चतुर्थीला आदासा येथे बाल गणेशाचे दर्शन घेण्यासाठी विदर्भासह विविध ठिकाणांहून आलेल्या भाविकांनी गर्दी केली. गुरुवारी जवळपास तीन लाख भाविकांनी गणेशाचे दर्शन घेतल्याचे देवस्थानच्या विश्वस्थांनी सांगितले. जिल्हा सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी सपत्निक गणेशाची पूजा केल्यानंतर पहाटे पाच वाजता मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. यावेळी सह न्यायाधीश एस.पी. बेदरकर, तहसीलदार गणपतराव पुरके, अ‍ॅड. शिरीष बानाईत, अ‍ॅड. प्रकाश टेकाडे,जयंत मुरमुरे, डॉ. कृष्णा भगत आदी उपस्थित होते. आदासा देवस्थानचे पूजारी माधव महाराज यांनी सहकार्य केले. तीळी चतुर्थी असल्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांतील भाविक दर्शनासाठी आले. कळमेश्वर, सावनेर, मोहपा, काटोल, नागपूर येथून एस.टी. बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थानने भाविकांसाठी सोयी केल्या असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.