सरत्या वर्षाला निरोप व नववर्षारंभानिमित्त साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी आलेल्या पालख्यांच्या गर्दीमुळे मंगळवारी शिर्डी साईनामाच्या गजराने दुमदुमून गेली. नववर्षानिमित्त १ जानेवारीला साईभक्तांच्या देणगीतून साई प्रसादालयात मोफत भोजन दिले जाणार असल्याची माहिती संस्थानचे कार्यकारी अधिकारी अजय मोरे यांनी दिली.
मोरे म्हणाले, नाताळच्या सुट्टय़ांमुळे भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व भाविकांना श्रींच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणा-या गर्दीचे नियोजन योग्य रीतीने व्हावे यासाठी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी हिंदू-मराठी भक्तिसंगीताचा कार्यक्रम झाला. रात्री पारस जैन, प्रवीण महामुनी व जिम्मी शर्मा यांची साईभजनसंध्या झाली. दि. २४ ते ३१ डिसेंबर या सुट्टय़ांच्या कालावधीत सुमारे ४ लाख २२ हजार साईभक्तांनी साई प्रसादालयात प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. सामान्य दर्शन बारीतून साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या सुमारे ६ लाख ४०० साईभक्तांना मोफत प्रसाद लाडू वाटप करण्यात आले. दररोज सकाळी भाविकांसाठी  अल्पोपाहार म्हणून अन्न पाकिटांची व्यवस्था करण्यात आली आहे.