वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे रविवारी अखेर सुरू झाली. त्यामुळे आता मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो असलेल्या कुलाबा ते सीप्झ या तिसऱ्या मेट्रो रेल्वे मार्गाकडे मुंबईकरांचे डोळे लागले आहेत. या प्रकल्पाचे काम जानेवारी २०१५ मध्ये सुरू करायचे, असा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा विचार असला तरी त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याबाबत हालचाली सुरू न झाल्याने हे वेळापत्रकही रखडणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हा भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प ‘मुंबई मेट्रो रेल कॉपरेरेशन लि.’च्या (एमएमआरसी) माध्यमातून राबवण्यात येणार आहे. कुलाबा ते सीप्झ या ३३ किलोमीटरच्या मार्गावर धावणारी भुयारी मेट्रो रेल्वे कुलाबा, वांद्रा-कुर्ला संकुल, अंधेरी औद्योगिक वसाहत आणि सीप्झ या व्यावसायिक केंद्रांना एकमेकांशी जोडेल आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांना या ठिकाणांशी जोडेल. या मेट्रो रेल्वेला आठ डबे असतील आणि दर तीन मिनिटांना एक गाडी सुटेल, असे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी वित्तपुरवठा करण्याबाबत ‘जापनिज इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’ अर्थात ‘जायका’ने सहमती दर्शवली आहे. प्रकल्प खर्चाच्या २४ हजार कोटी रुपयांपैकी चार हजार कोटी रुपये ‘एमएमआरडीए’ तर चार हजार कोटी रुपये केंद्र सरकार भागभांडवल म्हणून गुंतवतील. मुंबई विमानतळ चालवणाऱ्यांकडून ७७७ कोटी रुपये घेण्यात येतील. तर ‘जायका’कडून साडेबारा हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळेल.
आराखडा तयार करून बांधकाम करून देणे (ईपीसी) या तत्त्वावर भुयारी मेट्रो रेल्वेचे काम होणार आहे. काम जलदगतीने व्हावे यासाठी कामाची विभागणी एकूण सात भागांत करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी ‘एल अ‍ॅण्ड टी’, ‘युनिटी’, ‘अ‍ॅफकॉन’सह अनेक जागतिक दर्जाच्या कंपन्यांनी इतर नामवंत कंपन्यांशी संयुक्त भागीदारी करीत पूर्व अर्हता प्रस्ताव दाखल केले. जुलै २०१४ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू केल्यानंतर ऑक्टोबर २०१४ मध्ये यशस्वी कंपन्यांना कामाचे कंत्राट देण्याचा मानस आहे.
पण निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यामुळे जानेवारी २०१५ पासून कामाला सुरुवात होण्याबाबत साशंकता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
* कुलाबा-सीप्झ या मेट्रो रेल्वे प्रकल्पात २७ स्थानके असतील. पैकी २६ स्थानके भुयारी असतील. आरे कॉलनी स्थानक जमिनीवर असेल.
* राज्य सरकारने कार डेपोसाठी आरे कॉलनीतील ३० हेक्टर जागा संपादित करण्यास परवानगी दिली आहे.
* भुयारी स्थानके सरासरी १५ ते २५ मीटर खोलीवर असतील.
* या भुयारी मेट्रोसाठी ‘कट अ‍ॅण्ड कव्हर’ किंवा ‘न्यू आस्ट्रियन टनेल’ अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
* २०२१ मध्ये ही मेट्रो रेल्वे सुरू होण्याची अपेक्षा असून ताशी दोन्ही दिशांना ७८ हजार प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे.

दुसऱ्या मेट्रोला ‘धोरणलकव्या’चे ग्रहण!
चारकोप-वांद्रे-मानखुर्द मार्गावर नियोजित असलेल्या दुसऱ्या मेट्रो रेल्वेच्या कारडेपोच्या जागेसाठी पर्यावरण परवानगी मिळत नसल्याने हा प्रकल्प रखडल्याचे वरकरणी दिसत असले तरी या प्रकल्पासमोरील खरे आव्हान आहे ते धोरणात्मक निर्णयाचे. आता चारकोपऐवजी दहिसपर्यंत हा मार्ग पुढे नेऊन कारडेपोच्या जागेचा प्रश्न सोडवण्याचा जुनाच खेळ नव्याने सुरू करण्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात आणि अरुंद रस्त्यांवरून या सुमारे ३२ किलोमीटर लांबीच्या मार्गावर उन्नत मार्गाने मेट्रो बांधणे अशक्यप्राय असल्याने या मार्गावरही भुयारी मेट्रोचा पर्याय पुढे आला होता. पण राज्य सरकारच्या धोरणलकव्यामुळे दुसऱ्या मेट्रोचे भवितव्य अधांतरी लटकत आहे. चारकोपला १९.७ हेक्टर तर मानखुर्दला २४ हेक्टरची जागा हवी. तेथे गाडय़ा धुण्याच्या प्रश्नावरून प्रकरण रेंगाळले आहे.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या साडेअकरा किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाने (रस्त्यावर खांब उभारून त्यावरून जाणारी मेट्रो) जाणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे या पट्टय़ातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. केवळ रस्त्याची अवस्था खराब झाली असे नव्हे तर ठिकठिकाणी रस्ते अरुंद झाले. त्यामुळे मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात उन्नत मार्गाने मेट्रो रेल्वे बांधणे जवळपास अशक्यप्राय आहे. बळजबरीने असे प्रकल्प राबवलेच तर केवळ ते रखडतील असे नव्हे तर मुंबईतील रस्त्यांचीही चाळण होईल या निष्कर्षांप्रत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील अधिकारी आले.
दुसरी मेट्रो रेल्वे उन्नत मार्गाने बांधण्यास पश्चिम उपनगरांतील रहिवासी संघटनांनी विरोध केला आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षी मुंबईतील लोकप्रतिनिधींनीही चारकोप-वांद्रे-मानखुर्द रेल्वे उन्नत मार्गाने बांधण्यास विरोध केला. बांधकामासाठी मार्ग (राइट ऑफ वे) मिळण्यास अनंत अडचणी येणार हे स्पष्ट आहे. तरीही दुसरी मेट्रो भुयारी करण्याबाबत ठोस निर्णय होत नाही व या ‘धोरणलकव्या’मुळेच दुसऱ्या मेट्रोचा प्रश्न असाच खितपत पडला आहे. चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो रेल्वे हा मुंबईतील दुसरा मेट्रो रेल्वे मार्ग असून त्याची लांबी ३१.८७ किलोमीटर आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर तो हाती घेण्यात आला. प्रकल्पाचे कामही ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ला मिळाले. २००९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. या प्रकल्पाची किंमत ८२५८ कोटी रुपये होती. पण या प्रकल्पाच्या कारडेपोंचा प्रश्न पर्यावरण परवानगीच्या कचाटय़ात अडकल्याने आता चार वर्षे उलटूनही प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. मूळ नियोजनानुसार २०१० पासून पूर्ण जोमाने काम सुरू होऊन २०१४ मध्ये ते संपणार होते. पण या प्रकल्पाची साधी वीटही रचली गेली नाही.