डिसेंबर महिन्यातील २१, २२ आणि २८ व २९ या दिवशी विजयदुर्गमध्ये सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या पुढाकाराने विजयदुर्ग वासीयांचा हा पर्यटकांसाठी आखलेला विशेष उपक्रम आहे.    छत्रपती शिवरायांच्या मराठा आरमारात समाविष्ट झालेला पहिला जलदुर्ग-विजयदुर्ग, ऐतिहासिक रामेश्वरमंदिर, गिर्ये बिच, दामले मळा, नौकायनव्दारे पुरातन नैसर्गिक गोदी आणि वाघोटन खाडी अशा विजयदुर्गच्या कवेत सामावलेल्या गोष्टींचे प्रशिक्षित गाईडमार्फत दर्शन, त्याचबरोबर कोकणातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी या कालावधीत पर्यटकांना चाखायला मिळणार आहे.    विजयदुर्गच्या आजूबाजूस लांबलचक समुद्र चौपाटय़ा, समुद्रात होणारे डॉल्फीनचे दर्शन, डोंगर उलटा खोदून खोलात वसलेले रामेश्वर मंदिर, मोठी जहाजे-गुराबे-मचवे यांच्या बांधणी व डागडुजीसाठी असलेली ऐतिहासिक नैसर्गिक गोदी, आंब्याच्या लांबलचक बागा या व अशा असंख्य गोष्टींची माहिती येणाऱ्या पर्यटकांना मिळणार आहे. याचबरोबर २१ व २८ डिसेंबरच्या सायंकाळी विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी ढोल-ताशांचे खेळ, गोफ नृत्य, गजनृत्य, कापड खेळे, दशावतार, मालवणी नाटय़छटा त्याचप्रमाणे पर्यटकांसाठी अंगणातील गप्पा असा आगळावेगळा कार्यक्रम व इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.    २००५ च्या डिसेंबरमध्ये साजरा करण्यात आलेल्या किल्ले विजयदुर्गच्या अष्टशताब्दी वर्ष महोत्सवाच्या अफाट प्रसिध्दी आणि लोकप्रियतेनंतर दरवर्षी लाखो पर्यटक, शिवप्रेमी, निसर्गप्रेमी येथे येऊ लागले. विजयदुर्गच्या पूर्वाश्रमीच्या ऐश्वर्याला आलेली मरगळ आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. यावेळच्या डिसेंबर महिन्यातील महोत्सवात सहभागी होणाऱ्या पर्यटकांची निवास-न्याहारीची सोय स्थानिकांनी आपल्या घरांमधून करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे डिसेंबरातील शेवटचे दोन शनिवार-रविवार अशा दोन वेळी मालवणी जेवणाच्या लज्जतीबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही सहभागी पर्यटकांना मिळणार आहे. पर्यटनाच्या आनंदाबरोबरच सामाजिक व्यवस्थेचे भान राखून येथील रहिवाशांना संजीवनी देण्याच्या मनोदयातून येणारा पर्यटक येथील ग्रामस्थांना अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी (बाळा कदम-मो.क्र.९४२०३०८१००) आणि (प्रसाद देवधर-मो.क्र.९४२३०५१७१४ ) यांच्याशी संपर्क साधावा असे किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे कळविण्यात आले आहे.