दिवाळी.. आनंददायी.. पण यंदा किल्ला, फटाके, आकाशकंदील यात रमणारा बालचमू परीक्षेच्या जंजाळात गुरफटला असून सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका शाळांची सुट्टी दिवाळीच्या अगोदर फक्त एक दिवस सुरू होणार आहे. बालचमूंना मिळणारी अवघी १३ दिवसांची सुट्टी पालकांची डोकेदुखी कमी करणारी असली, तरी बालकांच्या उत्साहावर विरजण घालणारीच ठरली आहे. आणि दुसऱ्या बाजूला दिवाळीनंतर लगेचच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होत आहे.
यापूर्वी दिवाळीची सुट्टी सणा अगोदर ५ ते ६ दिवस होती. मात्र यंदा शिक्षण विभागाने परिपत्रक काढून दिवाळीची सुट्टी  दि. १ नोव्हेंबर पासून १३ दिवस म्हणजे १३ नोव्हेंबपर्यंत जाहीर केली आहे. १४ नोव्हेंबर रोजी मोहरम असल्याने  ती शासकीय सुट्टी या दिवाळी सुट्टीसोबतच आहे. १५ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्षांतले दुसरे सत्र सुरू होत आहे. शिक्षण विभागाकडून वर्षभरात विद्यार्थ्यांना ७५ सुट्टय़ा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दिवाळी आणि उन्हाळी सुट्टी समाविष्ट असून अन्य सुट्टय़ा धार्मिक व राष्ट्रीय सण यासाठी आहेत. शाळकरी मुलांना दिवाळी सुट्टी म्हणजे ‘फुल्ल एन्जॉय’ किल्ला बनविणे, फटाके फोडणे, आकाश कंदील तयार करणे याबरोबर घरोघरी तयार होत असलेल्या चविष्ट फराळांचा आस्वाद घेणे हा ठरलेला कार्यक्रम असताना यंदा शिक्षण विभागाने सुट्टीची कालमर्यादा कमी करीत वेळ मात्र चुकीची साधली आहे. दिवाळी सणानंतर मिळणारा सुट्टीचा कालावधी  बिनउपयोगी असल्याने बालचमू नाराज आहे.
अनेक शैक्षणिक संस्थांनी व शाळांनी सहामाही परीक्षेचे वेळापत्रक शेवटच्या दिवसांपर्यंत नियोजित केले असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेत गुंतवून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अभ्यास असल्याने विद्यार्थ्यांना दिवाळीची मौज दुरापास्त झाली आहे.
दुसऱ्या बाजूला शिवाजी विद्यापीठाच्या पदवीसाठीच्या  प्रथम वर्षांच्या पहिल्या सत्राची परीक्षा दि. ७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे युवक वर्गालाही दिवाळी सणाची मौज न करता अभ्यासात स्वतला गुंतवून घ्यावे लागत आहे. त्यातच पालकवर्ग सुट्टी असली, तरी अभ्यास करण्यासाठी मुलांना भाग पाडत असल्याने यंदाची दिवाळी म्हणजे ‘नो एन्जॉय.. ओन्ली परीक्षा टेन्शन’.