News Flash

मैत्र दिनाचा उत्साह तर, रक्षाबंधनची भावनिकता

‘दुनियादारी’ चित्रपटातील ‘तेरी मेरी यारी..में गयी दुनियादारी’ या डीएसपीच्या संवादावर स्वार होत दोस्त मंडळींनी रविवारी येणारा मैत्र दिन उत्साहात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.

| August 2, 2014 01:05 am

‘दुनियादारी’ चित्रपटातील ‘तेरी मेरी यारी..में गयी दुनियादारी’ या डीएसपीच्या संवादावर स्वार होत दोस्त मंडळींनी रविवारी येणारा मैत्र दिन उत्साहात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. आपल्या आवडत्या मित्र व मैत्रिणीला खूश करण्यासाठी शुभेच्छापत्र, टेडीबेअर्स, चॉकलेट या बेगमीसह काही तरी ‘खास’ देण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यासाठी व्यावसायिकांनी भेटवस्तूंना ‘वैयक्तीक’ स्पर्शाचे स्वरूप देण्यासाठी विविध क्लृप्त्या लढविल्या आहेत. तर दुसरीकडे भाऊ-बहिणींच्या उत्कंट प्रेमाचा साक्षीदार असणाऱ्या ‘रक्षाबंधन’साठी दुकानदारांनी तयारी सुरू केली आहे.
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा जागतिक स्तरावर मैत्री दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. काही वर्षांपासून भारतातही या दिवसाचे प्रस्थ वाढत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसह कट्टा गँगपर्यंत साऱ्यांनी हा दिवस अविस्मरणीय कसा करता येईल यासाठी धडपड चालविली आहे. प्रथमच महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या युवकांनी मैत्री दिवसाचे आपल्या वरिष्ठांकडून ऐकलेले खुमासदार किस्से आणि चित्रपटातील यारी दोस्तीचे प्रसंग डोळ्यांसमोर ठेवत आपल्या लाडक्या ‘क्रश’ला साद घालण्यासाठी कॉलेज रोडसह शहरातील दुकानांमध्ये भेटवस्तू खरेदीसाठी गर्दी केली आहे. तरुणाईची आवड लक्षात घेत टेडी बेअर्स, विविध आकारांतील की-चेन, शुभेच्छा पत्र, पाऊच, बेल्ट, अंगठय़ा यासह वेगवेगळ्या फ्लेवर्स आणि आकारातील चॉकलेट बाजारात आले आहेत. याशिवाय या भेटवस्तूंना खास टच देण्यासाठी व्रिकेत्यांनी शक्कल लढविल्या आहेत. मित्राला देण्यात येणाऱ्या शुभेच्छा पत्रकावरील मजकूर असो वा आपल्या आवाजातील एखादे गाणे ध्वनिमुद्रित करीत संगीत शुभेच्छा पत्र, लाकडावर मैत्री दिनाचा मजकूर मुद्रित करणे, चिनीमातीत बनविलेले कप व टेराकोटाच्या विविध शोभेच्या वस्तूंवर मित्रांचे ग्रुप फोटो, कोलाज् करण्यात येत आहे. विविध माध्यमांतून मैत्री दिनाच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी यासाठी आर्थिक तोशिष सोसण्याची अनेकांची तयारी आहे. अगदी पाच रुपयांपासून ते दीड हजार रुपयांपर्यंत नानाविध भेटवस्तूंची दुकानांमध्ये रेलचेल आहे. व्यावसायिक अनंत सोनार यांनी मैत्री दिन साजरा करण्यासाठी तरुणाईची खर्चाची तयारी असल्याचे मान्य केले. त्यांचा खरेदीचा उत्साह दांडगा असून काही तरी वेगळे करण्याकडे अनेकांचा कल आहे. आपली भेटवस्तू आपल्या मित्र-मैत्रिणींच्या कायमस्वरूपी लक्षात राहावी यासाठी ‘होऊ दे खर्च, मित्र आहे मस्त’ या मानसिकतेतून तरुणाईची खरेदी सुरू आहे.
दरम्यान, आर्थिक खर्चाला फाटा देत अनेकांनी आपल्या बाईकवर श्रावणसरीत शहराबाहेरील पांडवलेणी, अंजनेरी, वणी अशा काही भागांकडे रपेट मारण्याचे नियोजन केले आहे. तरुणाईच्या उत्साहाला येणारे उधाण पाहून पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त तैनात करण्याची तयारी केली आहे.

इस्कॉन मंदिरात हरित मैत्र दिनाचा कार्यक्रम
आपल्या सभोवताली असलेले वृक्ष आणि प्राणी हे मानवी जीवन जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. सतत काही तरी देण्याची वृत्ती असलेली ही मंडळी निरपेक्ष भावनेने काम करतात. निसर्गाने दिलेल्या या अमूल्य देणगीचे संवर्धन व्हावे, या निमित्ताने युवा वर्गाचे निसर्गाशी नाते जोडले जावे, या उद्देशाने रविवारी इस्कॉन मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनावर आधारित ‘मैत्री : एक अनुबंध’ या संकल्पनेवर डॉ. आदिती मिशाळ उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. यानंतर मैत्री दिनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी प्रत्येकाला फ्रेंडशिप बेल्ट म्हणून तुळशीचे रोप भेट देण्यात येणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम नि:शुल्क असून १८-३० वयोगटातील युवा वर्गाला सहभागी होता येईल. या संदर्भात अधिक माहितीसाठी आरती पांडे (९८२२२ ६२८०७) या क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 1:05 am

Web Title: curiosity about friendship day
Next Stories
1 विद्युत पारेषणचे सुरक्षा रक्षक वेतनवाढीपासून वंचित
2 तलाठय़ांचा कारभार मनमानी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रकार
3 दऱ्याखोऱ्यातील गावांचे सर्वेक्षण
Just Now!
X