गोंदिया पालिकेचे नगराध्यक्ष दीपक नशिने यांनी आपल्या राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. यानंतर नवीन नगराध्यक्षपदासाठी दिवाळीनंतर निवडणूक घेण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, आता नगराध्यक्षाच्या राजीनाम्याला १३ दिवसांचा कालावधी लोटला असून जिल्हा प्रशासनाने अद्यापही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नाही. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा प्रभार उपविभागीय अधिकारी सावरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
गोंदिया नगर परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. जवळपास दोन महिन्यांपूर्वी उपाध्यक्ष लोकेश यादव यांनीही राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा मंजूर करून १ नोव्हेंबरला उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात काँग्रेस पक्षाचे राकेश ठाकूर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मात्र, त्यांनी देखील लगेच दोन दिवसांत राजीनामा दिला. या घडामोडीपूर्वीच नगराध्यक्ष दीपक नशिने यांनी आपल्या पदाचा राजीनामा २९ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी दिवाळीपूर्वीच निवडणूक होईल, असे चित्र होते. मात्र, प्रशासनाने काही तांत्रिक अडचणी व प्रक्रियेअभावी नगराध्यक्षपदासाठी दिवाळीनंतर लगेच निवडणूक घेण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, आता दिवाळी होऊन जवळपास पाच दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या वतीने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचनाही जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर गेली असल्याची चर्चा नगर परिषदेत सुरू आहे.
सध्या नगराध्यक्षपदाचा प्रभार उपविभागीय अधिकारी सावरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. नगर परिषदेत नगराध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विकासात्मक कामाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्याकरिता अडचणी निर्माण होत आहे. याचा थेट परिणाम मात्र शहराच्या विकास कामांवर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे, तर नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लावायची, याबाबतची तयारीही सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या निवडणुकीच्या कार्यक्रमाची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतरच नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीला वेग येण्याची शक्यता आहे.