News Flash

वाहतूक पोलिसांची सौजन्यशीलता!

वरळी वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या उद्दाम वर्तवणुकीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर वाहतूक विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना सौजन्याने वागण्याचे आदेश दिले आहेत.

| April 13, 2013 12:21 pm

वरळी वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या उद्दाम वर्तवणुकीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर वाहतूक विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना सौजन्याने वागण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची काही ठिकाणी अंमलबजावणी होताना दिसते तर काही ठिकाणी अजूनही वाहतूक पोलिसांच्या वागण्यात बदल झालेला दिसत नाही. मात्र डी. एन. नगर वाहतूक पोलिसांनी सौजन्याचे पालुपदच आळवल्याचे दिसत आहे. या विभागाच्या हद्दीतील वाहतूक पोलीस रस्त्यावर नियमन करताना कुठेही झाडाआड लपून राहत नव्हते वा केवळ दंड गोळा करण्याऐवजी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांशीही सौजन्यानेच वागत होते.
डी. एन. नगर वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी यासाठी त्यांच्या हद्दीतील सर्व वाहतूक पोलिसांचे बौद्धिक घेतले होते. आमच्या विभागात तरी आम्ही सौजन्य पाळण्याच्या कडक सूचना वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत. समोरचा कितीही तावातावाने वागत असला तरी तुम्ही शांतपणे त्याला सामोरे जा, असे आम्ही त्यांना बजावले होते. सर्व मुख्य रस्त्यावर तैनात करण्यात आलेल्या पोलिसांना खास सूचना करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर येणाऱ्या तक्रारीही आपण स्वत: पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना केवळ दंड करण्यापेक्षा वाहतुकीचे नियम पाळले जावेत, याला आम्ही महत्त्व दिल्याचे पाटील यांनी सांगितले.
पाटील यांनी सांगितलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी जुहू लिंकिंग मार्गावरील जंक्शनवर सदर प्रतिनिधी स्वत: हजर होता. सिग्नल तोडणाऱ्यांकडून दंड गोळा करण्यापेक्षा त्यांचे परवाने पाहून त्यांना सौजन्य शिकविले जात होते.
वाहतूक पोलिसांची ही गांधीगिरी अंधेरी पश्चिम येथील जुहू गल्ली जक्शंनवरही अनुभवायाला मिळत होता. जुहू सिग्नलवरील वाहतूक शिपाई तुषार कुंभार हे तर फारच सौजन्याने वागत होते. आपण सिग्नल तोडला आहात. त्यामुळे आपल्याला परवाना जमा करावा लागेल. दंड भरल्यानंतर परवाना परत केला जाईल, असे सौजन्याने सांगत होते. काहीजण हुज्जत घालत होते. तरीही ते शांतपणे सगळ्यांना समजावत होते. तीच परिस्थिती अंधेरी जंक्शनवर होती. तेथे सचिन राणे ही भूमिका बजावत होते. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी शिकविलेली शिष्टाई येथे दिसून येत होती..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2013 12:21 pm

Web Title: curtsey of traffic police
Next Stories
1 पोलिसी खाबूगिरीचे नवे स्लॅब
2 चोऱ्या दोन, योगायोग अनेक
3 रवी जाधव, उमेश कुलकर्णी, विजू माने यांचा ‘शूट अ शॉर्ट’
Just Now!
X