News Flash

सीमाशुल्क विभागाने अडविलेला कंटेनर गोदामातून चोरीस

तस्करीच्या संशयाने सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतलेला कंटेनर उरण येथील द्रोणागिरी नोडमधील डीआरटी या गोदामात ठेवला होता.

| September 5, 2014 12:01 pm

तस्करीच्या संशयाने सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतलेला कंटेनर उरण येथील द्रोणागिरी नोडमधील डीआरटी या गोदामात ठेवला होता. हा कंटेनर मालासहित चोरीला गेला असून महत्त्वाचे म्हणजे हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून चोरटय़ांनी त्या ठिकाणी त्याच क्रमांकाचा रिकामा कंटेनर ठेवला होता. मात्र अखेर हे भिंग फुटले. चोरीला गेलेल्या कंटेनरमध्ये दोन कोटी रुपयांचे रक्तचंदन असल्याचा दावा उरण पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केलेली आहे. या प्रकरणी अभिजित जीगमणी जीगीयो यांनी उरण पोलिसात फिर्याद दाखल केलेली असून साईनाथ जगन्नाथ पाटील, स्वप्निल मधुकर पाटील, प्रताप रामचंद्र धायगुडे, अविनाश नारायण म्हात्रे व अकबर शफी हुसेन ऊर्फ राजू भाई मुंबई यांना अटक करण्यात आलेली आहे. या आरोपींनी उरण न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ सप्टेंबपर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी बी. एम. आव्हाड यांनी दिली आहे. या आरोपींकडून ६ लाख ७० हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. डीआरटी कंपनीत निर्यातीसाठी आलेल्या संशयित कंटेनर सीमाशुल्क विभागाने थांबविलेले होते. त्यानंतर डीआरटी गोदामात असलेल्या या मालाने भरलेला कंटेनर गोदामाच्या बाहेर काढून त्याच्या जागी तशाच रंगाचा व बनावट क्रमांकाचा कंटेनर ठेवण्यात आलेला होता. तपासादरम्यान सदरचा कंटेनर हा रिकामाच असल्याचे आढळून आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून गोदामातून सीमाशुल्क विभागाने थांबविलेला कंटेनर चोरीला गेल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2014 12:01 pm

Web Title: customs department seized container stolen
टॅग : Container
Next Stories
1 शिक्षकदिन विशेष : झोपडपट्टीतील विद्यार्थी सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारा शिक्षक
2 समाजप्रबोधनाची सुरुवात स्वत:पासून..
3 वाढीव एफएसआयवरून स्थानिक काँग्रेस नेत्यांचा थयथयाट
Just Now!
X