सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसरातील सीडब्ल्यूसीचे गोदाम बंद पडल्याने येथील ३७३ कामगार तसेच त्यांच्या कामावर अवलंबून असलेल्या पाचशेपेक्षा अधिक कामगारांच्या रोजगाराचा मागील सहा महिन्यांपासून प्रश्न निर्माण झाला आहे.या कामगारांना त्यांचा रोजगार पूर्ववत मिळावा याकरिता सीडब्ल्यूसीचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली होती. त्यांनी यावेळी कामगारांच्या शिष्टमंडळाला येत्या दोन महिन्यात ही समस्या सोडविण्यासाठी तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने कामगारांना न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
नुकताच केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा तसेच सीडब्ल्यूसीचे मंत्री रामविलास पासवान यांनी जेएनपीटी तसेच उरणमधील सीडब्ल्यूसीच्या गोदामांना भेट देऊन त्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना सीडब्ल्यूसीच्या कारभारात कमजोऱ्या असल्याचे सांगत येथील पाचपैकी चार गोदामे नफ्यात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
गोदामांचा नफा वाढविण्यासाठी तसेच येथील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सीडब्ल्यूसीच्या कारभाराची चौकशी केली जाईल. यामध्ये दोषींवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. येथील सीडब्ल्यूसीच्या गोदामात स्थानिक भूमिपुत्र काम करीत आहेत.
त्यामुळे गोदाम बंद पडल्याने अनेक कुटुंबांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. त्यातच या गोदामातील जुन्या कंत्राटदारांनी कामगारांच्या १७ महिन्याच्या जवळपास एक कोटी रुपयांच्या भविष्य निर्वाह निधीचाही भरणा केलेला नाही. गोदाम सुरू करावे या मागणीसाठी उरणमधील सर्वपक्षीय नेते कामगारांसोबत रस्त्यावर उतरले आहेत.त्यासाठी आंदोलनही सुरू आहे.
कामगारांच्या समस्या घेऊन उरणचे आमदार मनोहर भोईर, कामगारांचे नेते भूषण पाटील तसेच स्थानिक नेत्यांनीही भेट घेऊन सीडब्ल्यूसीचे गोदाम पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी केली आहे.