पर्यावरणविषयक जनजागृतीच्या उद्देशाने लातूर महोत्सवाच्या पुढाकाराने गुरुवारी (दि. ९) ‘सायकल डे’ साजरा केला जाणार आहे.
स्वयंचलित वाहन चालवण्याची सवय या ना त्या कारणामुळे लहानपणापासूनच लावली जात आहे. लोकसंख्येच्या वेगाने स्वयंचलित वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. मागील महिन्यात शहरातील अनेक चौकांनी प्रदूषणात धोक्याची पातळी ओलांडल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने जाहीर केला. या पाश्र्वभूमीवर लोकांमध्ये प्रदूषणाची जागृती व्हावी, या साठी गुरुवारी दिवसभर शहरवासीयांनी वाहनांऐवजी सायकलचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार अमित देशमुख यांच्यासह सर्वच जण या दिवशी सायकलचा वापर करणार आहेत. विद्यार्थी, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक यांनी यासंबंधी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दयानंद कला महाविद्यालयाने गेल्या १५ दिवसांपासून दर शनिवारी सायकल डे सुरू केला आहे. या उपक्रमाचेही लातूर क्लबच्या वतीने स्वागत करण्यात आले.

महिलांसाठी चालण्याची स्पर्धा
लातूर महोत्सवांतर्गत गुरुवारी दुपारी ४ वाजता महिलांसाठी चालण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. गांधी चौकातून या स्पध्रेला प्रारंभ होईल. गांधी चौक, मुख्य रस्ता ते उड्डाण पुलावरून राजीव गांधी चौक हा स्पध्रेचा मार्ग आहे. दुपारी तीनपर्यंत स्पर्धकांना सहभागास वेळ दिली आहे. विजेत्यास ११ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. अधिकाधिक महिलांनी भाग घेण्याचे आवाहन डॉ. स्नेहल देशमुख, रचना भार्गव, अॅड. शुभदा रेड्डी, गीता अग्रवाल यांनी केले आहे.

सुंदर माझे घर स्पर्धा
लातूरकरांसाठी सुंदर माझे घर स्पर्धा महोत्सवात आयोजित केली आहे. घराची अंतर्गत व बाहय़ सजावट, रंगरंगोटी, प्रकाशरचना, पाणी पुनर्भरण, कचरा व्यवस्थापन, हरितपट्टा, सौर यंत्रणा व स्वच्छता आदींचा विचार करून घराची निवड केली जाणार आहे. पहिल्या तीन विजेत्यांना फेस्टिव्हलच्या वतीने बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पध्रेचे अर्ज १० जानेवारीपर्यंत देण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.