जागतिक वारसा ठरलेल्या मध्यप्रदेशातील भीमबेटकाच्या पुराइतिहासकालीन चित्रगुहांच्या तोडीच्या अश्मयुगीन चित्रगुहा अमरावती जिल्ह्य़ातील मोर्शीनजीक सातपुडय़ाच्या पायथ्याशी आढळून आल्यानंतर पुरातत्व विषयाशी संबंधित संस्थांनी त्यांची दखल घेतली खरी. पण, अजूनही या चित्रगुहा दुर्लक्षित आहेत.
अलीकडेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची चमू या चित्रगुहांपर्यंत पोहोचली. पण, या गुहांचा शोध लावणाऱ्या अमरावतीच्या निसर्गवेडय़ा संशोधकांचा पुरातत्व खात्याला विसर पडला. मोर्शी तालुक्यात सातपुडय़ाच्या पायथ्याजवळ धारूळ हे आदिवासीबहुल गाव आहे. या गावाजवळच सुमारे १२ ते १५ हजार वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन चित्रगुहा आहेत. अमरावतीच्या सहा निसर्गप्रेमींनी भटकंतीदरम्यान २००७ मध्ये या चित्रगुहांचा शोध लावला होता. त्यांच्या या कार्याची दखल पुरातत्वशी संबंधित अनेक संस्थांनी घेतली. ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येही चमूने शोधकार्याचे सादरीकरण केले. एवढेच नव्हे, तर ‘पुराकला’ आणि ‘पुरातत्व’ जर्नलमध्येही या चमूचे शोधलेख प्रसिद्ध झाले.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नागपूर येथील कार्यालयातील एक पथक गेल्या वर्षी चित्रगुहांपर्यंत पोहोचले. पण, या पथकाने संशोधकार्य करणाऱ्या अमरावतीच्या संशोधकांशी साधा संपर्क साधण्याचेही सौजन्य दाखवले नाही. अजूनही या संशोधकांचा साधा उल्लेखही पुरातत्व विभागाने केलेला नाही. डॉ. व्ही.टी. इंगोले, प्र.सु. हिरूरकर, पद्माकर लाड, डॉ. मनोहर खाडे, ज्ञानेश्वर दमाहे, शिरीषकुमार पाटील या निसर्गप्रेमींनी सातपुडा पर्वतराजीत या चित्रगुहा हुडकून काढल्या आहेत. या चित्रगुहा भीमबेटकाच्या आग्नेय दिशेला १५० किलोमीटर अंतरावर आहेत, तर अमरावतीपासून उत्तरेकडे सुमारे ८५ किलोमीटरवर आहेत. चित्रगुहांचा आकार ३० मीटर रुंद, १० मीटर उंच आणि आतील भाग १० मीटपर्यंत आहे. या चित्रगुहांना ‘आर्ट गॅलरी’ सारखे स्वरूप देण्यात आले आहे.
भीमबेटकापेक्षाही हा परिसर मोठा आहे. गुहांमध्ये प्राण्यांची चित्रे चितारण्यात आली आहेत. सुरुवातीला या चमूने ११ गुहा शोधून काढल्या. नंतरच्या काळात त्यांची संख्या शंभपर्यंत पोहोचली. या चित्रगुहांमध्ये हत्ती, एकशिंगी गेंडा, सांबर, चितळ, रानडुक्कर, रानगवा, रानकुत्रे, वाघ, बिबटय़ा या प्राण्यांसह जिराफासारख्या प्राण्यांचेही चित्र त्यावेळच्या अश्मयुगीन आदीमानवांनी काढून ठेवलेली आहेत. निवाऱ्यासाठी या गुहांचा वापर करणाऱ्या आदिमानवांनी ही चित्रे रेखाटली आहेत. अनेक प्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा या चित्रांच्या माध्यमातून जपल्या गेल्या आहेत. शिवाय, मानवी समूहांच्या स्थलांतराच्या इतिहास संशोधनात या गुहा अत्यंत मोलाच्या ठरू शकतात. हे दालन पुरातत्व विषयाची आवड असणाऱ्या लोकापर्यंत पोहोचवणे आवश्यक असताना पुरातत्व विभागाने केवळ संशोधनाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप होत आहे. पुरातत्व खात्याच्या प्रागैतिहासिक विभागाने मात्र स्वत: अन्वेषण करून या गुहा शोधल्याचा दावा केल्यावर तर या गुहा शोधून काढणारे निसर्गप्रेमी चांगलेच अवाक् झाले. या संशोधकांशी संपर्कही साधण्यात आला नव्हता.

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार