18 September 2020

News Flash

ना प्राचार्य, ना प्राध्यापक; भावी गुरुजींचा कोंडमारा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न सुमारे ४९ अध्यापक विद्यालयांपकी २९ विद्यालयांत सध्या ना प्राचार्य, ना शिकवण्यासाठी अध्यापक असे चित्र आहे. कोठे नुसत्याच टोलेजंग इमारती,

| August 15, 2013 01:54 am

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न सुमारे ४९ अध्यापक विद्यालयांपकी २९ विद्यालयांत सध्या ना प्राचार्य, ना शिकवण्यासाठी अध्यापक असे चित्र आहे. कोठे नुसत्याच टोलेजंग इमारती, तर कोठे पत्र्याच्या खोल्यांचे वर्ग. शिकवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या दोन व्यक्तींवर कसाबसा कारभार हाकला जातो. शैक्षणिक चळवळीचा दर्जा टिकावा म्हणून सतत माहिती जमवणारे उल्हास उढाण यांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या कागदपत्रांतून हे चित्र उभे राहिले आहे.
दरवर्षी विद्यापीठ प्रशासनाकडून कोणत्या महाविद्यालयास संलग्नता द्यायची याची पाहणी केली जाते. पाहणीत संस्थाचालकांना सतत सवलत दिली जाते. परिणामी, २९ विद्यालयांत शिकवण्यासाठी अध्यापकच नाहीत. पण संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश मात्र दिले आहेत. विद्यापीठ प्रशासनाकडून रिक्त पदे आणि त्या विद्यालयांतील विद्यार्थिसंख्या याबाबत जसजशी माहिती अधिकारात विचारणा होऊ लागली, तसे प्रशासनाने नव्याने पत्र काढून विद्यार्थ्यांसमोर नवाच पेच निर्माण केला आहे. २००८मध्ये घेतलेल्या विद्या परिषदेच्या निर्णयाचा हवाला देत असे कळविले, की अध्यापक विद्यालयात एक अध्यापक नियुक्त असेल तर एकास १५ असे अध्यापक-विद्यार्थी गुणोत्तर गृहीत धरून तेवढय़ाच विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येतील.
अध्यापक विद्यालयात १०० विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य, ७ प्राध्यापक व १ ग्रंथपाल अनिवार्य आहे. राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण संस्थेने त्याचे निकष ठरविले, मात्र ते कोणीच पाळत नाही. अध्यापक विद्यालयात कोणी शिकवायला नाही तरीही परीक्षा घेतल्या जातात आणि नंतर हेच उमेदवार शिक्षक होतात. प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील दर्जाचा प्रश्न येथून निर्माण होत असल्याने विद्यापीठाने अशा विद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करावे, अशी मागणी उल्हास उढाण यांनी केली. ज्या अध्यापक विद्यालयांत शिक्षक नाहीत, त्यांची कुलगुरूंनी विशेष समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. ही विद्यालये काही राजकीय पुढाऱ्यांची असल्याने विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्याऐवजी त्यांना वर्षभराचे संलग्नीकरण करून दिले जाते. अर्हताधारक प्राचार्यपदासाठी जाहिरात देऊनही उमेदवार मिळत नसल्याचे काही संस्थाचालक सांगतात, मात्र काही संस्थाचालकांनी जाहिरातीही दिल्या नाहीत. शिक्षक घडविणाऱ्या संस्थांची अशी दयनीय स्थिती असल्याने दर्जा खालावल्यास दोष कोणाला द्यायचा, असा उढाण यांचा सवाल आहे. ज्या विद्यालयात शिकवण्यास कोणीच नाही, तेथे विद्यार्थ्यांनी मात्र प्रवेश घेतले असल्याची माहिती परीक्षा विभागाने दिली.
हीच ‘ती’ महाविद्यालये!
आदित्य कॉलेज ऑफ एज्युकेशन, नालवंडी रस्ता, बीड (९२), जनता शिक्षण प्रसारक मंडळ, कॉलेज ऑफ एज्युकेशन (९६), महारुद्र बाप्पा मोटे, कॉलेज ऑफ एज्युकेशन, गिरवली (९४), केशवराज कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोनेगाव, बीड (९४), भगवानराव केदार कॉलेज ऑफ एज्युकेशन, वारणी (तालुका शिरूरकासार, बीड) (९०), माऊल विद्यापीठ केज, भाऊसाहेब पाटील कॉलेज (२९), नवीन उस्मानाबाद जिल्हा बालविकास समिती महानंदा कॉलेज ऑफ एज्युकेशन, बँक कॉलनी, उस्मानाबाद (१००), राजीव गांधी विचारधारा प्रतिष्ठान कॉलेज एज्युकेशन, चिंचोली (तालुका भूम) (८५), राजर्षी शाहू कॉलेज ऑफ एज्युकेशन, एमआयटी कॉलनी, अंबाजोगाई (बीड), रामचंद्र सांस्कृतिक क्रीडा मंडळ, सी. पी. कॉलेज (जालना) (६९), संत गजानन कॉलेज ऑफ एज्युकेशन (७८), सावित्रीबाई फुले शिक्षण संस्था गुरुकुल कॉलेज ऑफ एज्युकेशन, बीड (९९), सय्यद पीर हाजीअली बुखारी कॉलेज ऑफ एज्युकेशन, खुलताबाद, शरदचंद्र पवार स्पेशल कॉलेज ऑफ बी. एड., जटवाडा रस्ता, हर्सूल, शिक्षक नेते शिवाजीराव कॉलेज ऑफ एज्युकेशन, भेडाळा, गंगापूर, औरंगाबाद (९३), बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ एज्युकेशन, अंबाजोगाई, बीड (९९), तलत कॉलेज ऑफ एज्युकेशन, खुलताबाद, औरंगाबाद (९९), विवेकानंद शिक्षण संस्था, श्रीनाथ कॉलेज ऑफ एज्युकेशन (१०१), कंसातील आकडे विद्यार्थिसंख्येचे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2013 1:54 am

Web Title: d ed colleges picture grim
टॅग Aurangabad
Next Stories
1 हिंगोलीत वाळूघाट लिलावातून ९० लाखांचा महसूल अपेक्षित
2 विलासराव स्मृती वक्तृत्व स्पर्धेस चांगला प्रतिसाद
3 अंबाजोगाईत विवाहितेचा खून, केजला चिमुरडीवर विषप्रयोग
Just Now!
X