18 September 2020

News Flash

‘डी’ म्हणजे दर्डा गँग!

‘डी गँग’ म्हणजे ‘दर्डा गँग’ असे सांगत खासदार चंद्रकांत खैरे यांनी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यावर पुन्हा टीकास्र सोडले. ‘डी’ म्हणजे ‘दलित’ असा अर्थ काढला

| October 1, 2013 01:55 am

‘डी गँग’ म्हणजे ‘दर्डा गँग’ असे सांगत खासदार चंद्रकांत खैरे यांनी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यावर पुन्हा टीकास्र सोडले. ‘डी’ म्हणजे ‘दलित’ असा अर्थ काढला गेल्याने महापालिकेत खैरेंविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मिलिंद दाभाडे यांच्यासह नगरसेवकांनी पत्रकार बैठक घेऊन माफी मागण्याचे आवाहन केले होते. तसे न केल्यास न्यायालयात खेचण्याचा इशाराही खैरे यांना दिला होता. या पाश्र्वभूमीवर ‘डी’ या अक्षराचा अर्थ खैरे यांनी नव्याने स्पष्ट केला. त्यामुळे खैरे-दर्डा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘डी’ अक्षराचा अर्थ ‘दलित’ असा काढला जाऊन रविवारी नगरसेवक दाभाडे, राजू शिंदे, अमित भुईगळ यांनी पत्रकार बैठक घेऊन खैरे यांच्यामुळे महापालिकेचा कारभार कसा बिघडला आहे, हे सांगितले होते. निवडणुकीतील गणितात दलित मतांचा आधार ‘डी’ या शब्दामुळे कापला जाऊ शकेल, असे वातावरण निर्माण करण्यात आले. तथापि, खैरे यांनी आज ‘डी’ म्हणजे ‘दर्डा’ असे कळविले.
खड्डय़ांवरून खैरे व दर्डा वादाला सुरुवात झाली. शहरातील खड्डय़ांची समस्या लक्षात घेऊन क्रांती चौकात वर्तमानपत्राच्या बॅनरखाली आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन बदनामीचा घाट असल्याचा आरोप करीत मंत्री दर्डावर टीकास्र सोडले. या प्रकरणी दर्डा यांनी अजून कसलीही जाहीर प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खैरे यांनी शिवसेनेने जाती-पातीचे राजकारण केले नाही, त्यामुळे कोणालाही जातीवरून हिणवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत एक ‘डी’ म्हणजे ‘दर्डा’ आणि दुसरे ‘दाभाडे’ असे म्हटले आहे. दाभाडे यांच्या पत्रकार बैठकीत सोबत असणारे काही नगरसेवक आज भेटल्याचे सांगत गैरसमज होऊ नये म्हणून ‘डी’ या अक्षराचे स्पष्टीकरण केल्याचे खैरे यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 1:55 am

Web Title: d meance darda gang criticism by khaire
Next Stories
1 ‘सत्य साईबाबांचे स्तोम हाही भ्रष्टाचारच’!
2 सांघिक कामातून लातूरचा लौकिक वाढवा- देशमुख वार्ताहर
3 महिलेसह चौघे लाचखोर तीन सापळ्यांत अडकले
Just Now!
X