राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची (बीओई) नियमित बैठक न झाल्याने शिस्तपालन कृती समितीने (डीएसी) केलेल्या शिफारशी कवडीमोल ठरल्याच शिवाय शिक्षा करण्यात आलेले प्राचार्य, शिक्षक, ग्रंथपाल आणि विद्यार्थी उजळ माथ्याने फिरत आहेत.
गेल्या नऊ महिन्यांपासून ‘बीओई’ नियमित बैठक झालेली नाही. डीएसीच्या शिफारशीवरून ११ मार्चच्या बीओईच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. खास करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचा आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पहिल्यांदाच डीएसीने घेतला होता आणि त्यावर परीक्षा मंडळाने शिक्कामोर्तबही केले होते. मात्र, ११ मार्चनंतर एकही नियमित बैठक झाली नसल्याने कार्यवृत्ताच्या मंजुरी अभावी बीओईच्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून बोओईचे काही सदस्य प्रयत्नशील असून नियमित बैठक कशी टाळता येईल, यासाठी ते प्रयत्न करीत असतात.
मार्चमधील बैठकीत नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागात विद्यार्थ्यांचे अवैधरीत्या गुणवाढ करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे एक प्रकरण डीएसीच्या शिफारशीनंतर परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चेला आले होते. यासंदर्भात ए.व्ही. दगडे या विद्यार्थ्यांवर पाच वषार्ंची बंदी घालण्यात आली होती. तसेच दगडे आणि कीर्ती बागडे यांच्या विरोधात एफआयआर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय डीएसीच्या शिफारशीवरून परीक्षा मंडळाने घेतला होता. दुसरे एक प्रकरण परीक्षेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या शिबा व्हॅल्सन, डॉ. गीता सिंग, ए.टी. बोरकर आणि एस.डी. नाईक या चार केंद्र प्रमुखांचे होते. परीक्षा मंडळाने (बीओई) एका वर्षांसाठी त्या चौघांनाही ‘डीबार’ करण्याचा निर्णय घेतला होता. डीएसी शिफारशीवरूनच परीक्षा मंडळाने एका प्राचार्यांवर पाच वर्षांंची बंदी घातली होती तर त्याच महाविद्यालयातील ग्रंथपालावर दोन वर्षांची आणि प्राध्यापकावर एक वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला. मात्र, शिक्षा सुनावण्यात आलेली ही मंडळी अद्यापही परीक्षेच्या कामात व्यस्त आहेत, हे विशेष.
येत्या ३० डिसेंबरला नियमित बैठक घेण्याचे ठरवले होते. मात्र, काही सदस्यांना येणे शक्य नसल्याने बैठक २ जानेवारीला घेण्याचे ठरले. सदस्यांना अद्यापपर्यंत पत्रच पाठवले गेले नाही. बैठकीची सूचना २१ दिवस अगोदर द्यावी लागते. अद्यापपर्यंत सूचनापत्र सदस्यांना मिळाले नसल्याने येत्या दोन जानेवारीला बीओईची बैठक होणे अशक्य आहे.
विद्यापीठ अधिनियमानुसार बीओईच्या वर्षांतून कमीत कमी दोन बैठका होणे आवश्यक आहेत. मात्र, नऊ महिने होऊनही बैठक न झाल्याच्या वृत्तास डीएसीचे अध्यक्ष डॉ. एकनाथ कठाळे यांनी दुजोरा दिला आहे.