राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या मालेगावातील हिरे घराण्याच्या सत्तेला सुरूंग लावत २००४ च्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून स्वत:ची एक खास ओळख निर्माण करणाऱ्या दादा भुसे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय प्राप्त करण्याची किमया केली. भुसे यांच्या झंझावातापुढे विरोधकांचा अक्षरश: धुव्वा उडाला. नाशिक शहरात मोदी लाटेचा डंका वाजला असला तरी ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव पडला नाही. मालेगाव बाह्य मतदारसंघात ‘भुसे फॅक्टर’ हाच महत्वाचा घटक असल्याचे या निवडणूक निकालांवरून स्पष्ट होत आहे.
शिवसेनेचे आ. दादा भुसे, भाजपचे पवन ठाकरे, राष्ट्रवादीचेसुनील गायकवाड, मनसेचे संदीप पाटील आणि काँग्रेसचे डॉ.राजेंद्र ठाकरे या पाचांपैकी भुसे, ठाकरे, गायकवाड यांच्यातच खरी लढत रंगणार असा कयास व्यक्त केला जात होता. तरीही भुसेंसाठी ही निवडणूक सोपी म्हटली जात होती. अपेक्षेप्रमाणे झालेही तसेच. त्यांच्या मताधिक्यात झालेली लक्षणीय वाढ आणि विरोधकांच्या मतांमध्ये झालेली घट बघता भुसेंसाठी ही निवडणूक अगदीच एकतर्फी झाली. २००४ च्या निवडणुकीत १० हजाराचे मताधिक्य मिळविणाऱ्या भुसे यांच्या मताधिक्यात २००९ मध्ये घसघशीत वाढ झाली होती. दुरंगी लढतीत त्यांनी तब्बल ३० हजाराची आघाडी घेतली होती. यावेळी मागील निवडणुकीपेक्षा जादा म्हणजे तब्बल ३७ हजारांपेक्षा अधिकचे मताधिक्य त्यांना मिळाले.
२००४ मध्ये पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना बलाढय़ हिरेंशी टक्कर घेत निवडून आल्यावर लोकांचा ‘सालदार’ म्हणून काम करणार अशी हमी भुसेंनी मतदारांना दिली होती. आमदार झाल्यावर फार भव्य-दिव्य स्वरूपातील कामे केल्याची त्यांच्या खात्यावर नोंद नाही. हे खरे असले तरी लोकांना काय हवं आहे ते ओळखून छोटय़ा-मोठय़ा समस्या सोडवण्यात ते सदैव तत्पर असतात. सर्वसामान्यांच्या सुख-दु:खात सहभागी होत असल्यामुळे सर्व स्तरात जनसंपर्क, लोकांना सहज अन् केव्हाही उपलब्ध होणारा आमदार अशी आपली ओळख निर्माण करण्यात भुसे यशस्वी झाले आहेत. या अर्थाने सालदार म्हणून काम करणार ही हमी त्यांनी आपल्या दहा वर्षांच्या वाटचालीतून खरी करून दाखवली आहे. कधीकाळी सुबत्ता नांदणाऱ्या मोसम व गिरणा खोऱ्यातील शेती पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे अडचणीत सापडली आहे. पाण्याच्या बाबतीत तूटीच्या म्हणून गणना होणाऱ्या या खोऱ्यांमध्ये पाच दशलक्ष घनफूटापेक्षा अधिक पाणीसाठय़ाचे बंधारे बांधण्यास शासनाचे र्निबध होते. त्यामुळे अनेक वर्षे मागणी होऊनही या दोन्ही नद्यांवर मोठे बंधारे बांधणे शक्य होऊ शकले नव्हते. भुसे यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यानंतर हे र्निबध शिथिल झाले. दोन्ही नद्यांवरील कोल्हापूर पध्दतीच्या दहा बंधाऱ्यांची  कामे मार्गी लागली. त्यातील काही बंधारे पूर्णत्वास आली असून काही प्रगतीपथावर आहेत. बंधारे झाल्यावर साधारणत: ५०० द.ल.घ.फू.पाण्याची उपलब्धता होऊन शेतीचा पाणी प्रश्न सुटण्यास बऱ्यापैकी मदत होऊ शकते. बंधाऱ्यांच्या या कामांमुळे लाभ क्षेत्रातील जनतेने भुसे यांना चांगली साथ दिल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून अधोरेखित होत आहे.
हिरे घराण्यातील सदस्य निवडणूक रिंगणात नसणे हे या निवडणुकीचे वैशिष्ठय़े म्हणावे लागेल. त्यामुळे भुसे यांच्यापुढे प्रबळ विरोधकच कोणी नव्हता. भाजपतर्फे ऐनवेळी अद्वय हिरेंचे खंदे समर्थक व खाकुर्डीचे सरपंच पवन ठाकरे यांना रिंगणात उतरविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा काही प्रमाणात त्यांना लाभ झाला असला तरी शेतीमालाचे घसरलेले दर हा मोदी सरकारच्या शेतीविरोधी धोरणाचा परिपाक असल्याचा समज झालेल्या शेतकरी वर्गात उमटलेल्या नाराजीचा मात्र त्यांना फटका सहन करावा लागला. भाजपतर्फे नांदगाव मतदार संघात रिंगणात असलेल्या अद्वय हिरेंच्या प्रचारात हिरेंची संपूर्ण यंत्रणा गुंतल्याने ठाकरेंसाठी हव्या त्या प्रमाणात कार्यकर्त्यांची रसद मिळू शकली नाही. राष्ट्रवादीतर्फे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले इच्छुक होते. काही दिवसांपासून त्यांनी तशी तयारीही सुरू केली होती. परंतु ऐनवळी नगरसेवक असलेल्या सुनील गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज भोसले प्रचार काळात कधी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसले नाहीत. शहरी पट्टय़ातील वैयक्तिक पाठबळ आणि ग्रामीण भागातील पक्षाची ताकद या जोरावर गायकवाड हे भुसेंना चांगली टक्कर देतील असे चित्र रंगविण्यात येत होते. परंतु भुसेंपुढे त्यांची अजिबात डाळ शिजू शकली नाही.
प्रत्येक निवडणुकीत मताधिक्क्यात वाढ
दादा भुसे (शिवसेना, विजयी) ८२ हजार ९३
पवन ठाकरे (भाजप) ४४ हजार ६७२
सुनील गायकवाड (राष्ट्रवादी) ३४ हजार ११७
संदीप पाटील (मनसे) ८ हजार ५००
डॉ.राजेंद्र ठाकरे (काँग्रेस) ४ हजार ५००