अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानामुळे रोज नवनवीन दालने उपलब्ध होत आहेत. त्यामुळे नव्या अभियंत्यांना एक व्यावसायिक जग खुणावत आहे. त्यामुळे तरुण अभियंत्यांनी  नव्या जबाबदाऱ्या आणि आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित दीक्षान्त समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ना.शरद पवार बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. अभिषेक सिंग हा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीसाठी इंजिनिअिरगच्या सर्व शाखांमधून सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. सर्वोत्कृष्ट व सर्वागीण प्रदर्शनासाठी रोहित मांगलेकर याला २०१२-१३ चे सुवर्णपदक देण्यात आले. संतोष येरमे याची सर्वोत्कृष्ट क्रीडापटू म्हणून निवड करण्यात आली.
वालचंदचे संचालक डॉ.वाय.व्ही.जोशी म्हणाले, सर्वच इंजिनिअरींग क्षेत्रात महाविद्यालयाने चांगली कामगिरी केली आहे. दरवर्षी अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करणे यावर आमचा अधिक भर असतो. गेल्या काही वर्षांत महाविद्यालयात परदेशी शिक्षकही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. विविध कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीच्या संधी  उपलब्ध होत आहेत,  हे महाविद्यालयाचे मोठे यश आहे. प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बी.टेक. विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ठ प्रदर्शन करणारे विद्यार्थी असे-  इलेक्ट्रॉनिक इंजिनिअिरग- स्वरुपा कमलाकर पाटील, योगेश सोनवणे, श्रेया सोळंके. सिव्हिल- धीरज सावंत, अनुजा तलाठी, नरेंद्र गुरव. मेकॅनिकल- अभिषेक सिंग, अमित गुरव, बलराम देवकर. इलेक्ट्रिकल- आसावरी तुलसी, गोपाल पावसकर, सागर पाटील. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअिरग- ऋषीराज हेशी, सुमित देिशगे, सुषमा देशमुख. इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी- मोनिका गीते, प्रदीप गायकवाड, प्रशांत नराडे.
ना.पवार पुढे म्हणाले,की महाराष्ट्रातील इंजिनिअिरग कॉलेजमध्ये वालचंदचा नंबर अव्वल आहे. १९४७ साली महाविद्यालयाची स्थापना झाली, त्या वेळी भारतात एकही आयआयटी नव्हते. गेल्या काही वर्षांमध्ये महाविद्यालयाने फार मोठी झेप घेतली आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी आज मोठय़ा कंपन्यात बडय़ा पदावर कार्यरत आहेत. हे महाविद्यालय अजूनही मोठी उंची गाठेल. विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशासाठी कष्ट, व्यावसायिकता व खिलाडूवृत्ती अंगीकारावी. वालचंद हिराचंद यांचे चरित्र वाचून त्यापासून प्रेरणा घ्या. समाजात वावरताना बाबा आमटे, मदर तेरेसा यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा, असेही ना.पवार म्हणाले.
या वेळी ना.पवार, अजित गुलाबचंद, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.जे.पवार, वालचंदचे संचालक डॉ.वाय.व्ही.जोशी यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पदक आणि प्रशस्तिपत्रके देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, आ.रमेश शेंडगे, माजी महापौर सुरेश पाटील, नितीन सावगावे, प्रा.शरद पाटील, श्रीनिवास पाटील यांच्यासह अन्य मान्यवर आणि विद्यार्थी  मोठय़ा संख्येने उपस्थित होते.