रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने (आठवले गट) जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी दलाई लामा यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
धम्म परिषदेच्या आयोजनासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कापसे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस भदंत सुगध (नाशिक), भदंत रत्नदीप (धुळे), भदंत आयुपाल (मुंबई) हे उपस्थित होते. दलाई लामा यांनी परिषदेस उपस्थित राहण्याचे मान्य केले असून नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात परिषद होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद आयोजित केली जात आहे.
परिषदेच्या प्रचारासाठी १६ लाख रूपये खर्चून धम्म रथ तयार करण्यात आला आहे. बौध्द धर्मगुरू जिल्ह्यातील प्रत्येक गावी जाणार आहेत, अशा प्रकारे जिल्ह्यात पहिलीच जागतिक धम्म परिषद होत असल्याची माहिती कापसे यांनी दिली.