गोंदिया जिल्ह्य़ातील कवलेवाडा येथील जाळण्यात आलेले संजय खोब्रागडे यांचा मेडिकलमध्ये उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, जोपर्यंत त्यांच्या पत्नीवरील आरोप मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने पोलिसांपुढील अडचणी वाढल्या. दरम्यान, ही मागणी मान्य न झाल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत मृतदेहाचे विच्छेदन झालेच नाही. बहुजन समाज पक्षानेही याच मागणीसाठी मेडिकलच्या शवविच्छेदनगृहासमोर निदर्शने केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याच मागणीसाठी उद्या, शनिवारीही निदर्शने केली जाणार आहेत.
१७ मे रोजी संजय खोब्रागडे हे घरी झोपलेले होते. पहाटे अडीच वाजताच्या सुमारास पाच-सहा जणांनी येऊन त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले होते. त्यात ते ९४ टक्के भाजले होते. सुरुवातीला त्यांना गोंदियातील केटीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांना त्याच दिवशी सायंकाळी मेडिकलमधील वार्ड क्र ४ मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना सात दिवसानंतर शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मृत्यू झाला. जाळण्याच्या घटनेनंतर गोंदिया आणि नागपुरातील विविध आंबेडकरी संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदवून आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. गावातील सहा जणांनी रॉकेल ओतून जाळल्याचे बयाण संजय खोब्रागडे यांनी मृत्युपूर्वीच न्यायदंडाधिकारी व गंगाझरी पोलिसांना दिले होते. या बयाणाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून गावातील सहा जणांना अटक केली होती. या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हाही दाखल करण्यात आला.
या प्रकरणाने दोन दिवसानंतर वेगळीच कलाटणी घेतली. संजय खोब्रागडेची पत्नी देवका आणि गावातील राजू गडपायले यांच्यात संबंध होते. या संबंधात अडसर ठरत असल्याने त्यांनी संजयला पेटवून त्यांचा काटा काढला, असे गंगाझरी पोलिसांनी स्पष्ट केले. तशी कबुलीच आरोपींनी दिली, असेही पोलिसांनी एका पत्रकार परिषदेत जाहीर केले. याप्रकरणी देवका खोब्रागडे आणि राजू गडपायले या दोघांनाही २१ मे रोजी अटक केली. अटक सत्रानंतर आंबेडकरी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. या प्रकरणातील खऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणाला कलाटणी देण्यात आल्याचा आरोप होऊ लागला. ठिकठिकाणी निदर्शने होऊ लागली. विचारवंत पत्रकार परिषदा घेऊन या प्रकरणाचा निषेध करू लागले. तसेच या प्रकरणाला वेगळे वळण देणारे गोंदिया जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक दिलीप झळके आणि गंगाझरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांना निलंबित करण्याची मागणी होऊ लागली.
शुक्रवारी सकाळी मृत्यू झाल्यानंतर संजय खोब्रागडे यांचा मृतदेह मेडिकलच्या शवविच्छेदनगृहात आणण्यात आला. ही माहिती मिळताच बसपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने तेथे गोळा झाले. मृत संजयची पत्नी देवकाविरुद्ध लावलेले आरोप मागे घेऊन तिला सोडून द्यावे, खऱ्या आरोपींची नार्कोटेस्ट करावी, या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करावी, तिला येथे आणल्यानंतर व पंचनाम्यावर स्वाक्षरी केल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेऊ, अशी मागणी मृत संजयचा मुलगा प्रदीप आणि मुलगी दुर्गा रंगारी यांनी येथे केली. या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. या मागणीला बसपा कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बसपचे माजी जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी अजनी ठाण्याचे पोलीस निरीक्षक डुमरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तैनात करण्यात आले होते. आंदोलनकर्ते मागणीवर ठाम असल्याने दुपापर्यंत परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृताची पत्नी न आल्याने पंचनाम्यावर स्वाक्षरी होऊ शकली नाही. त्यामुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंत संजय खोब्रागडे यांच्या मृतदेहाचे विच्छेदन झाले नाही. उद्या, शनिवारी मृत संजय खोब्रागडे यांची पत्नी आल्यानंतरच शवविच्छेदन होऊ शकते.