गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथे १७ मे रोजी रात्री झोपलेल्या संजय खोब्रागडे या दलित कार्यकर्त्यांला रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे. संजय खोब्रागडेच्या पत्नीनेच प्रियकर राजू गडपायले याला सोबत घेऊन संजय खोब्रागडेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलीस तपासादरम्यान उघडकीस आले असून यातील आरोपी देवकाबाई खोब्रागडे व तिचा प्रियकर राजू गडपायले या दोघांना अटक केल्यावर त्या दोघांनी गुन्हा कबूल केला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप झलके यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
या प्रकरणाला प्रारंभी सामाजिक स्वरूप देण्यात आले. दरम्यान, बौद्ध बांधवांमध्ये असंतोषाचे वातावरणही निर्माण झाले. प्राथमिक अहवालानुसार फिर्यादी संजय खोब्रागडे यांच्या संशयावरून कवलेवाडा येथील सरपंच, माजी सरपंचांसह एकूण ६ जणांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, पोलिसांनी अत्यंत संयमतेने प्रकरणाचा तपास करून अवघ्या दोन दिवसात खरे आरोपी शोधून काढले. तसेच १९ मे रोजी गोंदिया जिल्ह्य़ातील गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा गावातील घडलेल्या घटनेची माहिती घेण्याकरिता अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थूल व रोजगार हमी योजना आणि जलसंधारण मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी सोमवार, १९ मे रोजी दुपारी २ वाजता कवलेवाडाला भेट देऊन तेथील घटनास्थळाला भेट दिली. जखमी संजय खोब्रागडे यांच्या घरी जाऊन त्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली.
कवलेवाडातील नागरिक एकमेकांशी अत्यंत सामंजस्य व एकोप्याने राहत असताना अचानक मन सुन्न करणारी ही घटना कशी घडली, या घटनेमागचे नेमके कारण काय असू शकते, याबाबत त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली.  
संजय खोब्रागडेची पत्नी व तिचा प्रियकर यांच्या अनतिक संबंधातून त्याला जाळण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितल्यावर मंगळवारी गोंदियातील आंबेडकरवादी संघर्ष समितीने हे आरोप फेटाळून लावले असून पोलीस अधीक्षक डॉ. झलके या प्रकरणाला वेगळीच कलाटणी देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी ऋषीपाल टेंभरे, माधुरी टेंभरे, डॉ. प्रकाश रहांगडाले, भाऊलाल हरिणखेडे, पुनाजी ठाकरे, हेमंत ठाकरे यांनीच संजय खोब्रागडेला जाळले असल्याचे संजयने आपल्या बयाणात सांगितले होते, तसेच गावात यापूर्वीही याच सरपंच मंडळींनी संजय खोब्रागडेची गावातील पानटपरीच्या दुकानाचाही  जाळपोळ केली असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाला याच मंडळींच्या राजकीय दबावापोटी वेगळे वळण देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करून गंगाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप झलके यांना याप्रकरणाचा तपास करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्याची मागणी आंबेडकरवादी संधर्ष समितीने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
पत्रकार परिषदेला संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. राजकुमार बोंबार्डे, यशपाल डोंगरे, प्रफुल्ल भालेराव, विलास राऊत, मामा बनसोड, अनिल बनसोड, विनोद बनसोड, विनोद नंदुरकर, शुद्धोधन शहारे, रतन वासनिक आदी उपस्थित होते.