चप्पल विक्रेत्याबरोबर झालेल्या भांडणात बेदम हाणामारीप्रकरणी दक्षिण सोलापूरचे आमदार दिलीप माने यांच्या विरोधात राष्ट्रीय चर्मकार महासंघाने उडी घेतली असताना आता उत्तर सोलापूर तालुक्यातील काही दलित संघटना आमदार माने यांच्या पाठीशी धावून आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागल्याचे दिसून येते.
चप्पल विक्रेते जालिंदर मग्रुखाने व त्यांची मुले भारत व रवी यांना बेदम मारहाण करून त्यांच्या दोन्ही दुकानांची नासधूस केल्याप्रकरणी आमदार दिलीप माने व त्यांचे पुत्र पृथ्वीराज माने यांच्यासह बंधू नगरसेवक जयकुमार माने व नगरसेवक नागेश ताकमोगे आदींविरुध्द फिर्याद दाखल झाली होती, तर याउलट आमदार माने व पुत्र पृथ्वीराज माने यांना मारहाण केल्याप्रकरणी मग्रुमखाने पिता-पुत्रांविरुध्द गुन्हा नोंद झाला होता. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय चर्मकार महासंघाने मग्रुमखाने यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध  नोंदवत, आमदार माने पिता-पुत्राविरुध्द अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. नव्या पेठेतील व्यापाऱ्यांनी चप्पल विक्रेत्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ‘बाजारपेठ बंद’ ठेवली होती.
याउलट, आता आमदार दिलीप माने यांच्या बचावासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील दलित संघटना पुढे आल्या आहेत. तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी भडकुंबे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आमदार माने यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविला. भडकुंबे हे आमदार माने यांचे कट्टर समर्थक समजले जातात.