* प्रत्येक कुटुंबाला पाच गुंठे भूखंड देण्याची   मोर्चेकरांची मागणी
* भटके विमुक्त, दलित, आदिवासी, पारधी,  गोंधळी, वासुदेव जोशी व सर्वहरा समाजातील बेघरवासीयांना घरे द्यावीत
भटक्या विमुक्तांना जातीचे दाखले देण्याकामी ६० वर्षांचा पुरावा मागू नये, पिवळ्या शिधापत्रिकेसाठी १५ हजार रूपये उत्पन्नाची अट रद्द करावी आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सुभाष चव्हाण, भालचंद्र निरभवणे, कल्पना पांडे व संगिता विचारे यांच्या नेतृत्वाखाली पंचवटीतील आडगाव नाक्याहून निघालेल्या मोर्चात जाती भटक्या व विमुक्त जाती संघाचे सदस्य व पदाधिकारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. आपल्या मागण्यांचे निवेदन मोचेकऱ्यांनी जिल्हा प्रशासनास सादर केले. भटक्या विमुक्त व विधवा परितक्त्या यांना पिवळी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका त्वरीत द्यावी, जातीचा दाखला देण्यासाठी ६० वर्षांचा पुरावा मागू नये, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत ही योजना ग्रामीण प्रमाणे शहरातही लागू करावी, भटक्या विमुक्तांच्या समाज प्रमुखांच्या शिफारशीनुसार जातीचे दाखले देण्यात यावे, भटके विमुक्त, दलित, आदिवासी, पारधी, गोंधळी, वासुदेव जोशी व सर्वहरा समाजातील बेघरवासीयांना शासनाने घरे द्यावीत अथवा प्रत्येक कुटुंबाला पाच गुंठे भूखंड देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.