जलसंधारण विभागाच्या वतीने आठ बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्याने धरणांचा प्रदेश असूनही पाणीटंचाई भेडसाविणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागास किंचित दिलासा मिळाला आहे. मुरबाड तालुक्यात पाच, अंबरनाथमध्ये दोन तर कल्याण तालुक्यात एक बंधारा बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीच्या बदल्यात वनखात्याला पर्यायी जागा देण्यात आली असून कोणत्याही स्वरूपाचे पुनर्वसन करावे लागणार नाही. एकूण ८८ कोटी रुपयांच्या या योजनेतून परिसरातील सिंचन तसेच पिण्यासाठी पाणी देण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्य़ाच्या शहरी भागात भविष्यकालीन पाणीपुरवठय़ासाठी प्रस्तावित पोशीर, शाई तसेच काळू ही धरणे अद्याप कागदावरच आहेत. पर्यावरण, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तसेच आदी कारणांमुळे सध्या या योजना वादात सापडल्या आहेत. अगदी आता तातडीने जरी सर्व मंजुऱ्या मिळून त्यातील एखाद्या धरणाचे काम मार्गी लागले तरी पुढील दहा वर्षे त्यातून पाणीपुरवठा होणे शक्य नाही. त्यामुळे वाढत्या शहरांना लागणारे अतिरिक्त पाणी आणायचे कुठून असा प्रश्न आहे. त्याचबरोबर सिंचनासाठी पुरेसे पाणी नसल्याने शहरांलगतच्या ग्रामीण भागातील हजारो एकर जमिनी ओस पडल्या आहेत. नागरीकरणाच्या रेटय़ामुळे शहरांलगतच्या गावांचाही झपाटय़ाने विस्तार होऊ लागला आहे. या आठ बंधाऱ्यांमुळे परिसरातील शेतीला संजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या आठ योजनांसाठी लागणारी २०० हेक्टर जमीन वन विभागाची आहे. तेवढी पर्यायी जमीन देण्यात येणार आहे. केंद्रीय वन विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. साधारण सहा महिन्यात या प्रकल्पास मंजुरी मिळेल, असा विश्वास पाटबंधारे खात्यातील सूत्रांनी व्यक्त केला आहे. मुरबाड तालुक्यातील भुवन, वैशाखरे, हिरेघर, घोरले आणि पेंढरी अंबरनाथ तालुक्यातील चावे आणि अस्नोली तर कल्याण तालुक्यातील अंताड येथे बंधारे बांधण्यात येणार आहेत.