*  प्रवेश रद्द झाल्याचा संताप     
*  उशिरा माहिती दिल्याचा आरोप
उमरेड मार्गावरील के. एम. पांडव कॉलेज ऑफ आयुर्वेदिक महाविद्यालयातील बीएएमएसच्या प्रथम वर्षांच्या ५० विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आज संतप्त होऊन महाविद्यालयात  तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांना ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून दिले. अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयातही असाच प्रकार घडला.
पांडव आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रवेश रद्द झालेल्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना जवळपास वर्षभरानंतर प्रवेश रद्द झाल्याची माहिती महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. व्यवस्थापनाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने विद्यार्थी हिंसक झाले. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, विद्यार्थ्यांनी कुणालाही जुमानले नाही. महाविद्यालयात धुमाकूळ घालत दगडफेक करून वर्गखोल्यांच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्रातील १९ आयुर्वेद महाविद्यालयांमधील बीएएमएसच्या ४४० जागांच्या संदर्भात १५ ऑक्टोबर २०११ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या १४ नोव्हेंबर २०११च्या आदेशानुसार आयुष विभागातर्फे शैक्षणिक सत्र २०११-१२ साठी पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश नाकारण्यात आले होते. महाविद्यालयाच्या वतीने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. खंडपीठाने आपल्या अंतरिम आदेशात भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या शिफारशीनुसार फक्त पदवी अभ्यासक्रमासाठी तात्पुरती मान्यता प्रदान केली. १३ जुलै २०१२ रोजी ही याचिका न्यायालयाने खारीज केली. त्यांनतर महाविद्यालयाने ६ मार्च २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका देखील खारीज करण्यात आली.

उशिरा कळविल्याचा आरोप
या न्यायालयीन प्रकरणाबाबत सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या एक वर्षांनंतर कळवले आणि प्रवेश रद्द झाल्याची माहिती दिली, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक सत्रात सर्व अभ्यासक्रम, शिकवणी वर्ग, प्रात्यक्षिक पूर्ण केले आहे. अंतर्गत परीक्षा देखील दिल्या आहेत. महाविद्यालयाचे शिक्षण शुल्कही भरले आहे. या शैक्षणिक सत्रात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेपासून वंचित रहावे लागल्याने दोन वर्षांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झाले आहे, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार असून या नुकसानीची भरपाई होणार आहे काय, असा सवाल संतप्त विद्यार्थ्यांनी केला आहे.आयुर्वेदिक डॉक्टर होण्याचे या विद्यार्थ्यांचे स्वप्न मध्येच खंडित झाले आहे. त्यासाठी पूर्णपणे महाविद्यालयाचे व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.