शहरातील मध्यवस्तीत असलेल्या भाजीपाला बाजारामध्ये असलेल्या कापड दुकानाला रविवारी सकाळी लागलेल्या आगीत सुमारे ८० लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी अरुंद रस्ते, बाजार आणि नागरिकांच्या गर्दीमुळे आग विझविण्यास अडथळे येत होते. चार अग्निशामक बंब, मालपाणी उद्योगसमूह व नगरपालिकेच्या पाण्याचा टँकरद्वारे आग आटोक्यात आणण्यास तीन तासांहून अधिक वेळ लागला.
नेहरू चौकात घनश्याम डंग यांच्या मालकीचे ‘ओम साई कापड’ दुकान आहे. सहा-सात महिन्यांपूर्वीच त्यांनी हे दुकान सुरू केले होते. शनिवारी संगमनेरचा आठवडे बाजार झाल्यानंतर संध्याकाळी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले होते. दरम्यान, रविवारी सकाळी दुकानातील कपडय़ांनी पेट घेतला. दुकानात जवळपास ५०-६० लाखाचे कपडे होते. दुकान बंद असल्याने आतील कपडे पेटल्याचे बराच काळ कोणाच्या लक्षात आले नाही. मात्र साडेआठच्या सुमारास बंद शटरद्वारे धुराचे लोळ बाहेर पडू लागल्याने आगीचा प्रकार लक्षात आला. घटनास्थळी गेलेल्या नागरिकांनी तातडीने डंग यांना ही माहिती दिली.
आगीची माहिती समजताच काही वेळात संगमनेर नगरपालिका व थोरात साखर कारखान्याचे बंब घटनास्थळी बाजारातून मार्ग काढत पोहोचले. गर्दी बाजूला हटत नसल्याने त्याही परिस्थितीत आग विझविण्याचे अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू झाले. मात्र तोपर्यंत दुकानातील कपडे जळून खाक झाले होते. तर दुकानातील फíनचर जळत होते. आगीचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी ही आग शॉर्टसíकटने लागल्याची शक्यता आहे. सकाळी सात ते आठ या वेळेत वीजपुरवठा बंद असतो. त्याआधीच ही लाग लागल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी बाबासाहेब काळे नावाचे पोलीस कर्मचारी पोहोचले, मात्र तेही सिव्हिल ड्रेसवर असल्याने गर्दीला आवरणे त्यांना शक्य झाले नाही. तब्बल दोन- अडीच तासांनंतर पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत व पोलीस घटनास्थळी पोहोचले. शनिवारी संगमनेरचा आठवडे बाजार असतो. या दिवशी तालुक्यातून मोठय़ा प्रमाणात लोक बाजारात येत असतात.
दरम्यान, दुकानच्या वरच्या मजल्यावर एक कुटुंब राहते. आगीची माहिती या कुटुंबाला देखील नव्हती. तीन मुली घरातच झोपलेल्या होत्या. आगीचा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी ताबडतोब वर जाऊन झोपलेल्या मुलींना बाहेर काढले व घरातील गॅस टाक्या बाहेर काढल्या. आगीमुळे धुराचे लोळ उठल्याने नेमके काय झाले हेच बराच काळ कोणाला समजले नाही. थोडा जरी उशीर झाला असता तर या कुटुंबाला बाहेर आणणे अवघड बनले असते. वेळीच त्यांना बाहेर काढल्याने आगीत जीवितहानी टळली.
या भागाचा नगरसेवक असल्याने मला सकाळी ७.२५ वाजता फोन आला. मी तातडीने अग्निशामक दलासह इतरांना घटनेची माहिती देत येथे आलो. त्या वेळी धुराचे लोळ उठल्याने समोरचा माणूसही दिसत नव्हता. दीड-दोन हजार लोक जमा झाले होते. या सर्वानी आग विझविण्याचा प्रयत्न केला, असे नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे यांनी सांगितले.