ठाणे, कल्याण, शीळफाटा, नवी मुंबई, पनवेल अशा जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठय़ा झोकात सुरू असलेल्या डान्सबारकडे स्थानिक पोलीस पद्धतशीरपणे कानाडोळा करू लागले असून या अवैध धंद्यांवर बाहेरून ‘आयात’ केलेले पोलीस छापे टाकू लागल्यामुळे जिल्ह्य़ातील संपूर्ण पोलीस यंत्रणेचे पितळ उघडे पडू लागले आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचे गैरधंदे आणि गुन्हेगारी विश्वाला रसद पुरविणाऱ्या बिल्डरांना पाठीशी घालत असल्याच्या आरोपांमुळे नवी मुंबईची पोलीस यंत्रणा यापूर्वीच बदनाम ठरली आहे. दोन आठवडय़ापूर्वी पनवेल येथील एका डान्सबारवर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने छापा टाकून कोटय़वधी रुपयांची रोकड जप्त केल्यामुळे खळबळ उडाली होती. या पाश्र्वभूमीवर कल्याण शीळ फाटा रस्त्यावर मानपाडा परिसरातील मयूर डान्स बारवर मुंबई गुन्हे अन्वेषण पथकाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यामुळे ठाणे पोलीस हादरले आहेत. पत्रीपूल ते शीळफाटा दरम्यान, तब्बल ६६ बीयर तसेच डान्सबार सुरू असून त्याला जोडूनच लॉजिंग व बोर्डिगचे धंदे सुरू आहेत. या सगळ्या धंद्यांमधून कोटय़वधींची उलाढाल सुरू असून मुंबई पोलिसांची वक्रदृष्टी या धंद्यांकडे वळल्याने ठाणे पोलिसांचे धाबे दणाणले आहे.
दोन दिवसांपूर्वी दावडीनाका येथील मयूर बारवर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने छापा टाकून ६२ बार मालकांना अटक केली. या ठिकाणी दररोज कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. शीळफाटा रस्त्यावर २३ बीयर बार, ४३ लॉजिंग व बोर्डिग आहेत, तर २५ ठिकाणी पिकअप पॉइंट आहेत. बीयर बारमध्ये मद्यपान झाल्यानंतर लागूनच असलेल्या लॉजिंगमध्ये वेश्याव्यवसाय चालतो. ग्राहकांच्या सोयीसाठी ही व्यवस्था करण्यात आलेली असते. एखाद्या कडक पोलीस अधिकाऱ्याची वक्रदृष्टी झालीच, तर आम्ही बीयर बार चालवितो. लॉजिंग-बोर्डिगशी आमचा संबंध नाही असे सांगितले जाते. प्रत्यक्षात शीळफाटा मार्गावर कोणते धंदे चालतात आणि त्याचे आश्रयदाते कोण हे या भागातील शेंबडय़ा पोरालाही माहीत आहे.  
मानपाडा पोलिसांना दणका
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंगारवाले, बीयर बारवाले यांचे धंदे तेजीत आहेत. यापूर्वीही बाहेरून आलेल्या पोलिसांच्या पथकाने येथे येऊन छापे टाकले आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपद भूषविणाऱ्या काही अधिकाऱ्यांना यामुळे फटकाही बसला आहे. असे असतानाही मुंबई पोलिसांची पाठ वळताच मानपाडय़ातील गैरधंदे पुन्हा जोर धरू लागतात, असा आजवरचा अनुभव आहे. ज्या मयूर डान्सबारवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने कारवाई केली तो बार मानपाडा पोलीस ठाण्यापासून जेमतेम १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. असे असताना रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या वेश्याव्यवसायाकडे मानपाडा पोलिसांनी डोळेझाक कशी केली, याच्या सुरस कहाण्या आता चíचल्या जात आहेत.
 नवी मुंबईत बेबंदशाही
नवी मुंबई परिसरात तर स्थानिक पोलिसांचा बार मालकांवर कोणताही धाक राहिला नसल्याचे चित्र दिसू लागले आहे. सुनीलकुमार लहोरिया हत्या प्रकरणात नवी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या इभ्रतीचे पुरते वाभाडे निघाले आहेत. गुन्हेगारी विश्वाशी संबंध असलेल्या बिल्डरांना नवी मुंबई पोलीस कसे पाठीशी घालतात, याचा नमुना या प्रकरणामुळे पुढे आला आहे. रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिनधोकपणे बेकायदा बांधकामे सुरू असून तेथील काही वरिष्ठ अधिकारी आणि भूखंड माफियांचे साटेलोटे असल्याची चर्चा अगदी उघडपणे सुरु आहे. पनवेल परिसरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या बारवर बाहेरून आलेल्या पोलिसांनी छापा टाकण्याचे हे काही पहिले उदाहरण नाही. असे असताना नवी मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त अशोक शर्मा यांचा पोलीस दलावर वचक राहिला आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.