ठाणे पोलीस आणि महापालिका अशा दोन्ही प्राधिकरणांनी संयुक्तपणे हाती घेतलेल्या ‘लेडीज बारमुक्ती’च्या मोहिमेवर एव्हाना पाणी फिरण्याची चिन्हे दिसू लागली असून, गेल्या दोन महिन्यांपासून या बारमध्ये बंद असलेली ‘छमछम’ नववर्षांच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा जोमात सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमधील ५२ लेडीज बारपैकी बहुतांश बारची बांधकामे बेकायदा आहेत. अशा बारना अग्निशमन विभागाचा ‘ना हरकत’ दाखला देण्यास महापालिकेने हरकत घेतल्याने या नियमाचा आधार घेत पोलिसांनी या सर्व लेडीज बारचे परवाने रद्द केले होते. पोलिसांच्या या कारवाईला बारमालकांनी न्यायालयात आव्हान देताच यासंबंधी देण्यात आलेल्या एका आदेशाचा आधार घेत बारचे दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांत काही झालेच नाही अशा थाटात हे बार सुरू झाले असून रात्री उशिरापर्यंत स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुन्हा एकदा तेजीचा धंदा सुरू झाल्याने छमछममुक्त ठाण्याचे स्वप्न अधांतरित राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या लेडीज बारवर मुंबई गुन्हे अन्वेषण विभागामार्फत होणाऱ्या कारवाईमुळे खडबडून जागे झालेल्या ठाणे पोलिसांनी दीड वर्षांपासून या बारविरोधात सतर्कपणे कारवाई केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने वर्षभरापूर्वी एका बारवर टाकलेल्या छाप्यात बारमध्ये काम करणाऱ्या काही मुलींना कोंडवाडय़ाप्रमाणे भासणाऱ्या एका खोलीत कोंडून ठेवण्यात आल्याचे दिसून आले. याठिकाणी आगीसारखी दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते हे लक्षात येताच खडबडून जागे झालेल्या ठाणे पोलिसांनी महापालिकेशी संपर्क साधला. ठाण्याचे पोलीस सहआयुक्त लक्ष्मीनारायण आणि तत्कालिन महापालिका आयुक्त असीम गुप्ता या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे एक मोहीम हाती घेतली. लेडीज बारच्या बांधकामांची तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये सुमारे ४८ बार बेकायदा असल्याचे आढळून आले. असे बार बेकायदा असूनही महापालिकेच्या अग्निशमन विभागाने त्यांना ‘ना हरकत दाखले’ दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हे दाखले रद्द केले जावेत, असे आदेश असीम गुप्ता यांनी काढले. त्यानुसार दाखले रद्द होताच ठाणे पोलिसांनी या बारचे परवाने नाकारले आणि बघता-बघता लेडीज बार बंद पडू लागले. यापैकी काही बारची बांधकामे महापालिकेने जमीनदोस्त केली.

बारमुक्तीची मोहीम थंडावली
ठाणे पोलीस आणि महापालिकेने संयुक्तपणे हाती घेतलेल्या या कारवाईला काही बारमालकांनी न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच योग्य ती कारवाई केली जावी, अशा सूचना पोलीस आणि महापालिकेला दिल्या. बारमालकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले. त्यानुसार महापालिकेने या सर्व बारमालकांना अग्निशमन विभागामार्फत नोटिशी बजावल्या. दरम्यानच्या काळात या बारना अग्निशमन विभागाचे दाखले मिळावेत यासाठी ठाण्यातील काही राजकीय नेत्यांनी मध्यस्तीचे ‘प्रताप’ सुरू केल्याची चर्चा होती. या पाश्र्वभूमीवर नववर्षांच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील बहुसंख्य लेडीज बार पुन्हा सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. रात्री उशिरापर्यंत या बारमधील छमछमाट पुन्हा सुरू झाला असून, दोन ते अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर सुरू झालेल्या धंद्यामुळे बारमुक्तीच्या मोहिमेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यासंबंधी ठाण्याचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही, तर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख अरविंद मांडके यांनी मोबाइल उचलला नाही.