हल्ली शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सुदृढ राहण्यासाठी नृत्य करण्याचा सल्ला दिला जातो. नृत्यकलेचे हे महत्त्व जनमानसावर बिंबविण्याच्या हेतूने सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आणि अभिनेता नकुल घाणेकर याने त्याच्या ‘डिफरंट स्ट्रोक्स’ या संस्थेच्या वतीने डान्स मॅरेथॉन हा उपक्रम आयोजित केला आहे. या निमित्ताने ठाणेकरांना एकाच व्यासपीठावर विविध पाश्चिमात्य नृत्यप्रकार पाहता येतील. गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी नौपाडा-रामवाडीतील प्रशिक्षण केंद्रात दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत होणाऱ्या या डान्स मॅरेथॉनमध्ये इच्छुक नृत्यप्रेमींना विनामूल्य सहभागीही होता येणार आहे. रुवेदा साल्सा, बयाटा, झुक लव्ह, सांबा, किझोंबा, न्यूयॉर्क हसल, मेरेंगे आदी पाश्चिमात्य नृत्य प्रकारांचे प्रत्येकी ४५ मिनिटांचे सादरीकरण या मॅरेथॉनमध्ये केले जाईल. नृत्यप्रेमी ठाणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने या मॅरेथॉन नृत्य अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन नकुल घाणेकर यांनी केले आहे.