काँग्रेस व राष्ट्रवादीतल्या भानगडी आम्हाला बाहेर काढण्याची गरज नाही. ते दोघेच एकमेकांचे कपडे फाडत आहेत. त्यांच्यापेक्षा डान्सबार बरा, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केली.
महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणावर शिवसेनेच्या बूथप्रमुखांचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सुभाष देसाई, संपर्कप्रमुख रवींद्र मिल्रेकर, सहसंपर्कप्रमुख डॉ. शिवाजी दळणर, खासदार गणेशराव दुधगावकर, आमदार संजय जाधव व मीरा रेंगे, जिल्हाप्रमुख सुधाकर खराटे, बाळासाहेब जाधव, अर्जुन खोतकर, युवा सेनेचे डॉ. राहुल पाटील, उपनेते लक्ष्मण वडले, माजी आमदार हरिभाऊ लहाने, गजानन घुगे, महिला जिल्हासंघटक सखुबाई लटपटे आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले की, उद्याचे येणारे सरकार आमचे आहे. शिवसेनेत गटबाजीला थारा नाही. जो गटबाजी करील त्याला लाथ घालून बाहेर काढले जाईल. येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे, हिंदुत्वाचे बीज रोपण करायचे आहे. शिवसेना ही मर्दाची संघटना आहे. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर जनतेच्या प्रश्नांसाठी गुन्हे दाखल होत असतील तर अशा शिवसनिकांचा मला अभिमान वाटतो. काँग्रेस-राष्ट्रवादीची रणनीती फोडा व राज्य करा, अशी आहे. तेलंगणाच्या निमित्ताने तेलगू भाषिकांमध्ये फूट पाडण्याचे काम सरकार करीत आहे. महाराष्ट्राचा एक इंचही तुकडा आम्ही पडू देणार नाही. हीच हिंमत केंद्र सरकार सीमा भागातल्या मराठी बांधवांबाबत का दाखवत नाही, असा सवाल त्यांनी केला. सभेला शिवसनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 6, 2013 1:56 am