गणपतीपाठोपाठ तयारी सुरू झाली दांडियाची! तरुणाईला वेगळ्या आणि चांगल्या अर्थाने रस्त्यावर आणणाऱ्या या दांडियासाठी यंदा हिंदी चित्रपटसृष्टीने एकापेक्षा एक सरस ‘ताले’वार गाणी दिली आहेत. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादा सांभाळूनही यंदाच्या दांडियात बॉलिवूडची गाणी जोरदार वाजणार आहेत. यात ‘बोलबच्चन’ आणि ‘हाऊसफुल-२’ या चित्रपटांतील गाण्यांची चलती असेल.
दांडिया खेळण्यासाठी एका विशिष्ट तालातल्या गाण्यांची आवश्यकता असते. मात्र त्याच त्याच गाण्यांवर लोकांना नाचवण्यापेक्षा वेगळे काही शोधणाऱ्या आयोजकांनी गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी गाण्यांना त्या पारंपरिक तालाचा साज चढवला आहे. यात पार पन्नाशीच्या दशकात गाजलेल्या ‘रमैय्या वस्तावया’पासून अनेक गाण्यांचा समावेश त्या त्या काळात झाला. मात्र यंदा हिंदी चित्रपटसृष्टीत आलेल्या एकापेक्षा एक सरस ‘आयटम नंबर्स’मुळे आयोजकांची चिंता मिटली आहे.
यंदाच्या दांडियात ‘एजण्ट विनोद’ या चित्रपटातील ‘प्यार की पुंगी’ सगळ्यात जास्त वाजण्याचा संभव आहे. त्याचबरोबर ‘चिंताता चिता चिता’ आणि ‘चलाओ ना नैंनोंसे बाण रे’ या दोन्ही गाण्यांमध्ये दांडियाचा ठेका हा अतिशय सहजपणे मिसळत असल्याने ही दोन गाणीही धम्माल उडवून देतील. ‘बोलबच्चन’ याच चित्रपटाचे शीर्षकगीत ‘बोल बोल बोलबच्चन’ आणि त्यातीलच ‘नचले नचले जी भरके नचले’ या गाण्यांवरही पब्लिक ‘जी भरके’ नाचणार आहे.या गाण्यांशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अय्या’ चित्रपटातील ‘ड्रिमम वेकपम’ हे गाणेही दांडियात गाजेल, असे काही आयोजकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे ‘कॉकटेल’ चित्रपटातील ‘तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो’ या गाण्यावरही दांडिया खेळला जाणार आहे. अशा प्रकारची गाणी दांडियाच्या पारंपरिक ठेक्यात बसवून मग त्यावर दांडिया खेळला जाईल. गेल्या दोन तीन वर्षांत दांडियासाठी वाजणाऱ्या गाण्यांमुळे ‘रॉयल्टी’चा प्रश्न उपस्थित झाला होता. यंदा मात्र आयोजकांनी ती काळजी घेतली आहे.    
यंदाची संभाव्य टॉप टेन दांडिया गाणी
*  प्यारकी पुंगी – एजण्ट विनोद
* चिंताता चिता चिता – रावडी राठोड
* चलाओ ना नैनोंसे बाण रे – बोलबच्चन
* नच ले नच ले, जी भरके नचले – बोलबच्चन
* पापा तो बँड बजाए – हाऊसफुल-२
* तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो – कॉकटेल
* अनारकली डिस्को चली – हाऊसफुल-२
* आ आंटे अमलापुरम – मॅक्झिमम
* दिल गार्डन गार्डन हो गया – क्या सुरपकूल है हम
* ड्रीमम वेकपम – अय्या