भरधाव टेंम्पोने धडक दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर दुसरा दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील आयको सूतगिरणीजवळ सायंकाळी घडला. भालचंद्र गणपती मोहिते (वय ३५ रा.हिरेकुडी, ता.चिकोडी) असेअपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नांव आहे.     
भालचंद्र मोहिते हे पत्नी मीनाक्षी व मुलगी अंजली  यांच्यासमवेत बत्तीस शिराळा या सासरवाडीच्यागावी गेले होते. नागपंचमी निमित्त तेथील उत्सव पाहून व देवदर्शन करून ते कर्नाटकातील घरी निघाले होते. आयको सूतगिरणीजवळ दुचाकीवरून ते तिघे जण जात असतांना समोरून आलेल्या टेंम्पोने(एम.एच.०२ टी-७३९४) या दुचाकीस धडक दिली. त्यामध्ये भालचंद्र मोहिते हे टेंम्पोच्या खाली अडकले. त्यांच्या अंगावरून गाडी गेल्याने ते जागीच ठार झाले. या टेंम्पोने समोरून येणाऱ्या अब्दुल रझाकइस्माईल बैराकदार या हिरोहोंडा दुचाकीस्वारास धडक दिली. त्यामध्ये बैराकदार यांना हाताला किरकोळ दुखापत झाली. घटनास्थळी कुरूंदवाड पोलीस दाखल झाले होते.