विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर किमान दोन महिने काही करता येणार नसल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेची सर्वसाधारण सभा तब्बल तीन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. महापालिकेच्या ३४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येते.
मंगळवारची (ता. १९) महासभा नगरसेविका सुवर्णा केणे यांच्या निधनानिमित्त तहकूब करण्यात आली. ही सभा शुक्रवारी ठेवण्यात आली होती. कोणतेही कारण न देता ही सभा सोमवारी ठेवण्यात आली. ही सभा आता आजच्या मंगळवारी दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे. शासनाने जकातीचा विषय महापालिकेवर सोडला असल्याने कल्याण डोंबिवली शहरात जकात सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मलनिस्सारणाच्या सुमारे ६० ते ७० कोटींच्या निविदा मंजूर करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. डोंबिवलीतील उद्यानाचे आरक्षण उठविण्याचा प्रस्ताव तसेच मजूर संस्थांची सुमारे ७ कोटींच्या कामांच्या मंजुरीची प्रक्रियाही वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. या पाश्र्वभूमीवर सर्वसाधारण सभेच्या तारखा सातत्याने पुढे ढकलल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.