विशिष्ट रेल्वे गाडय़ांचा वर्धा जिल्ह्य़ातील काही स्थानकांवर थांबा देण्याबाबात रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी महिन्याभरात न झाल्यास आपण रेल्वे रोको आंदोलन सुरू करू, असा इशारा खासदार दत्ता मेघे यांनी सोमवारी दिला.
सावंगी येथील गणेश फे स्टिव्हलच्या निमित्ताने ते येथे आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. हिंगणघाटला काही गाडय़ांचा थांबा मिळावा म्हणून आपण सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला आहे. त्यांच्याकडून ठोस आश्वासनही मिळाले आहे. मात्र, अद्याप प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या एक महिन्यात आश्वासनांची पूर्तता न झाल्यास आपण रेल्वे रूळावर उतरून आंदोलन करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
वर्धा नगर परिषदेचे अध्यक्ष आकाश शेंडे यांना हटविण्यात काँग्रेसच्याच काही नगरसेवकांनी पुढाकार घेतला, हे अत्यंत चुकीचे आहे. पक्षाच्या तिकिटावर निवडून येणाऱ्यांनी पक्षशिस्त पाळायलाच हवी. राजकारणात अशी काही पथ्ये पाळणे अपेक्षित आहे. ती न पाळणाऱ्या अशा नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी आपण श्रेष्ठींकडे केली आहे. जिल्ह्य़ातील अतिवृष्टीचे नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना समाधानकारक मदत अद्याप मिळालेली नाही.
कृषीमंत्री शरद पवार यांना भेटून आपण याबाबत अवगत करणार असून जिल्ह्य़ास १०० कोटी रुपयांची विशेष मदत देण्याची मागणी आहे. महसूल यंत्रणेने शेतकऱ्यांना मदत देताना तांत्रिक बाबींचा बाऊ करू नये. तातडीने मदत द्यावी. कारण, शासकीय मदतीस विलंब झाला तर शेतकऱ्यांचा प्रशासनावरचा विश्वास उडतो. याचीही आपण दखल घेतली आहे, असे खासदार मेघे म्हणाले.
दरम्यान, मंगळवारी सावंगीच्या गणेशमूर्तीच्या पूजनात मेघेंसह माजी आमदार अमर काळे, माजी जि.प.सभापती नितीन देशमुख, बाजार समितीचे सभापती श्रीकांत गावंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी सपत्निक भाग घेतला. याच प्रसंगी गरजू नागरिकांसाठी मोफ त आरोग्यसेवा देणाऱ्या साई कार्डचा शुभारंभही करण्यात आला.
यावर्षीच्या गणेशात्सवाचे विशेष आकर्षण शिल्पकार हरिहर पेंदे यांनी साकारलेले केदारनाथचे वालुकाशिल्प ठरले आहे. याखेरीज विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन आगामी दहा दिवसात होणार आहे.