16 December 2017

News Flash

दुष्काळाचा दिवसागणिक चढता आलेख

रोजगार हमी योजनेची ९३८ कामे, त्यावर ११ हजार २५१ मजूर, २०६ छावण्यांमध्ये १ लाख

प्रतिनिधी, नगर | Updated: February 15, 2013 4:34 AM

रोजगार हमी योजनेची ९३८ कामे, त्यावर ११ हजार २५१ मजूर, २०६ छावण्यांमध्ये १ लाख २३ हजार ८९४ जनावरे आणि २१८ गावे व ८६८ वाडय़ांना २६० टँकरद्वारे पाणीपुरवठा, ही आहे जिल्ह्य़ातील दुष्काळाची सध्याची स्थिती. आत्ता कुठे उन्हाळ्याची चाहूल लागली असून येत्या चार महिन्यात या सगळ्याच आकडेवारीत काही पटींनी वाढ होईल.
जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या वर्षी पावसाने पाठ फिरवली आहे. पाऊस न झाल्याने मागच्या वर्षी (सन १२-१३) सुरू झालेले टँकर याही वर्षी पासाअभावी तसेच सुरू आहेत. केवळ पाण्याचे टँकरच नव्हे तर, जनावरांच्या छावण्या, रोहयोची कामे सलग दुसऱ्या वर्षी अखंडपणे सुरू आहेत. उन्हाळ्याची तीव्रता वाढत जाईल, तसतशी दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होणार आहेत. प्रमुख्याने लोकांच्या पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चार व पाणी हीच चिंतेची बाब आहे. सलग दुसऱ्या वर्षी पाऊस न झाल्याने ग्रामीण भागातील पाण्याचे स्थानिक छोटे-मोठे स्त्रोत पुर्ण अटले असून टँकर उपलब्ध असले तरी ते भरायचे कोठे असा प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे. सध्याच दूर अंतरावरून टँकर भरून आणले जात आहेत.
जिल्ह्य़ातील २१८ गावे व ८६८ वाडय़ांमधील तब्बल ४ लाख ७७ हजार लाकसंख्येला सध्या २६० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागात दुष्काळाची तीव्रता भयानक आहे. एकटय़ा पारनेर तालुक्यातच ४४ गावे व १७७ वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उत्तर भागातील श्रीरामपूर व अकोले हे दोन तालुके वगळता जिल्ह्य़ातील उर्वरीत बाराही तालुक्यामंध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात दक्षिण भागातच अधिक टँकर आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.गावे-वाडय़ा-टँकर याप्रमाणे हे आकडे आहेत. संगमनेर-८-६४-१४, कोपरगाव-२-९-२, राहुरी-२-८-१, राहाता-२-२९-५, नगर-३३-१६९-४७, पाथर्डी-१७-२३-२३, शेवगाव-१७-३२-१३, कर्जत-४८-१९४-५०, जामखेड-१७-१८-२८, श्रीगोंदे-१५-१४२-२१ आणि नेवासे- ३ वाडय़ांना १ टँकर.
जिल्ह्य़ात रोजगार हमी योजनेद्वारे साडेतेरा हजार तब्बल ७ लाख मजुरांना समावून घेण्याची क्षमता असून त्यातील ९३८ कामे सध्या सुरू आहेत, त्यावर ११ हजार २५१ मजूर काम करीत आहेत. पारनेरमध्येच ही संख्याही सर्वाधिक आहे. तालुक्यात ६९ कामांवर २ हजार ३१५ मजूर कार्यरत आहेत.
जिल्ह्य़ात दक्षिणेतील सातही तालुक्यांमध्ये जनावरांच्या छावण्या सुरू आहेत. राज्यातील सर्वाधिक सिंचनाखालील तालुका म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या श्रीगोंदे तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ४९ छावण्या सुरू असून २९ हजार ८७२ जनावरांना त्यात आश्रय देण्यात आला आहे. नगर तालुका- ३१ छावण्या, २० हजार ८७२ जनावरे, कर्जत- ४६ छावण्या, २७ हजार २६१ जनावरे, जामखेड- १० छावण्या, ७ हजार ३२३ जनावरे, पारनेर- ३ छावण्या, १ हजार ५६५ जनावरे, पाथर्डी- ४८ छावण्या, २३ हजार ७१८ जनावरे आणि शेवगाव- १९ छावण्या १३ हजार २८६ जनावरे याप्रमाणे मदतकार्य सुरू आहे.     

First Published on February 15, 2013 4:34 am

Web Title: day after day the graf of drought is increasing