दुष्काळ, उन्हाची तीव्रता, पाण्याची भासणारी टंचाई यामुळे पंढरपूर शहर व उपनगरांना पाच ते सहा दिवसच पुरेल असा पाणीसाठा असून वेळ पडल्यास एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागेल, असे मुख्याधिकारी रवींद्र जाधव यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले.
बुधवारी (दि. २७) नगराध्यक्षा उज्ज्वला भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली न.पा.ची सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सभेत आरोग्य विभागातील लिपीक राजेंद्र यशवंत शेटे व लोकमान्य विद्यालयातील शिपाई दिलीप वामन कुलकर्णी व विलास रासकर यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी दिलेल्या अर्जासह इतर सात विषय मंजूर केले आहेत. पाणीपुरवठय़ाबाबत बोलताना नगरसेवक नामदेव भुईटे यांनी पाणीपुरवठा एक दिवसाआड न करता फक्त दररोज १५ मिनिटे सर्वच भागातील पाणी पुरवठय़ात कपात करून दररोज पाणीपुरवठा करावा. ज्या नळाला तोटय़ा नाहीत त्यांना तोटी बसवून वाया जाणारे पाणी थांबवावे. तसे न करणाऱ्यावर फौजदारी दाखल करावे असे सुचवले.
सध्या पंढरपूर येथून शिरबावी, कासेगाव, सांगोला येथे पंढरपूर नदीवरून पाणीपुरवठा केला जातो. सध्या १४ द. ल. घ. फूट पाणीसाठा असून दररोज दोन द.ल.घ. फूट पाणी लागत आहे. पंढरपूरला ५ ते ६ तर सोलापूरला १५ ते २० मार्च पर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठी आहे. सांगोला येथील दुष्काळी भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे तेथे सध्या कपात करता येत नाही.
दि. ५ जानेवारी १३ च्या विविध विषय समित्या निवडीवेळी जो प्रकार घडला अन् निवडणूक स्थगित होऊन बॅलेट पेपर पळवणे, अधिकाऱ्यास अरेरावी करणे या गोंधळात नगरसेवक नायदेव भुईटे यास अटक व सुटका तर नगरसेविकेचे पती शिवाजी मस्के यास अटक यामुळे न.पा. ला. गालबोट लागले. शिवाय दि. २७ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या वेळी अटक होईल या कारणास्तव आठ सत्ताधारी तीर्थक्षेत्र विकास महाआघाडीच्या नगरसेवकांनी अटकपूर्व जामीन घेऊन बैठकीस हजेरी लावली.