दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक दया पवार यांचे नाव आले की, साहित्य विश्वाला नगरची आठवण होते, नगरच्या जिल्हा परिषदेला मात्र हे मान्य नसावे. जिल्हा परिषदेत दोन ठिकाणी जिल्ह्य़ातील पद्मश्री पुरस्कारप्राप्त व्यक्तींची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. त्यातून नेमके दया पवार यांनाच वगळण्यात आले आहे.      
कामानिमित्त या इमारतीत येणा-या दलित व साहित्य चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मनात ही सल  ठसठसते आहे. पुरस्काराने सन्मानित केलेल्या या मान्यवरांच्या रांगेत‘बलुतंकार पद्मश्री दया पवार यांचे छायाचित्र का नाही, दलितांच्या व्यथा, वेदना बोलक्या करणा-या या प्रतिभासंपन्न कवीचा जिल्हा परिषदेला विसर पडला आहे का, अशी खंत व्यक्त केली जात आहे.
पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे, पद्मश्री व पद्मभूषण आण्णा हजारे, पद्मश्री व मॅगेसेसे पारितोषिकप्राप्त डॉ. रजनीकांत आरोळे, पद्मभूषण बाळासाहेब विखे व पद्मश्री अरुण फिरोदिया यांच्या प्रतिमा अध्यक्षांच्या दालनात व जि. प. सभागृहात आहेत. मात्र जिल्ह्य़ातीलच‘दगडू मारुती पवार ऊर्फ दया पवार’यांना १९९० मध्ये पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले असले तरी त्यांचे छायाचित्र या पाच जणांसमवेत लावलेले गेलेले नाही.
मागील कार्यकाळात काँग्रेसकडे जि. प.ची सत्ता होती. पक्षाच्या शालिनीताई विखे यांनी पाच वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्या पदावर असतानाच त्यांचे सासरे, माजी खासदार बाळासाहेब विखे यांना पद्मभूषण पुरस्कार मार्च २०१०मध्ये मिळाला. त्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या दालनात व सभागृहात या पाचही जणांच्या प्रतिमा लावल्या. त्यांचे कार्य पंचायत राज व्यवस्थेच्या कार्यशाळेत तयार होणा-या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांसमोर कायमस्वरूपी असावा, असाही उद्देश विखे यांच्या मनात त्या वेळी असावा. परंतु त्याचवेळी पद्मश्री पवार यांची प्रतिमा काही तेथे लागली नाही. त्यामुळे या उद्देशात उणीव राहिली होती, परंतु त्याचवेळी त्यांनी ही चूक सुधारली नाही किंवा त्यांच्या लक्षात कोणी आणून दिली नसावी.  विखे मार्च २०१२ पर्यंत पदावर होत्या.
त्यानंतर राष्ट्रवादीचे विठ्ठलराव लंघे अध्यक्षपदावर विराजमान झाले. त्यालाही दीड वर्षांचा काळ लोटला. या दरम्यानही या चुकीची दुरुस्ती झाली नाही. अद्यापि तेथे दया पवार यांचे छायाचित्र लावलेले नाही.
कथा, कविता, समीक्षा, आत्मानुभव, ललितलेख अशा विविध साहित्यप्रकारांतून, विद्रोहाची भाषा न वापरताही अंतर्मुख करणारे लेखन करणा-या या साहित्यिकाचा जन्म अकोले तालुक्यातील धामणगाव येथे १९३५मध्ये झाला. नोकरीनिमित्त मुंबईतील परळच्या पशुवैद्यकीय कॉलेजमध्ये दया पवार यांनी प्रयोगशाळा सहायक म्हणून काम केले. १९७५ मधील त्यांच्या‘कोंडवाडा या पहिल्याच काव्यसंग्रहास राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्याहीपूर्वी १९६८ पासून ते दलित साहित्य चळवळीशी जोडले गेले. १९७८ मध्ये लिहिलेल्या त्यांच्या‘बलुतं’ या आत्मकथनाने सर्वच साहित्य चळवळी ढवळून काढल्या. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या‘डॉ. आंबेडकर चित्रपटाची पटकथाही त्यांनीच लिहिली. फ्रँकफर्ट येथील जागतिक परिषदेत त्यांनी दलित साहित्यावर शोधनिबंध सादर केला, कोलंबोतील जागतिक बुद्धिस्ट परिषदेतही ते सहभागी होते, राज्य सरकारच्या नाटय़संहिता छाननी समितीचे ते अध्यक्ष होते.  त्यांच्या मराठी साहित्यातील कामगिरीमुळेच केंद्र सरकारने त्यांना १९९० मध्ये पद्मश्री किताब बहाल केला, डिसेंबर १९९६ मध्ये त्यांचे दिल्लीत अकाली निधन झाले.