गेले वर्षभर चर्चेत असलेले मध्य रेल्वेवरील डीसी-एसी परिवर्तनाचे काम आता संपले असून आता केवळ सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याचा शेवटचा औपचारिक बाब असलेला टप्पा शिल्लक राहिला आहे. सुरक्षा प्रमाणपत्रासाठी या कामाचा अहवाल आणि अर्ज मध्य रेल्वे येत्या आठवडय़ात रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे सादर करणार आहे. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त या कामाची पाहणी करून सर्व योग्य असल्यास सुरक्षा प्रमाणपत्र देतील. त्यामुळे महिनाभरात कल्याणपासून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंतच्या सर्व मार्गिका एसी विद्युतप्रवाहावर चालतील. परिणामी मुंबई उपनगरीय क्षेत्रात येणाऱ्या नवीन बंबार्डिअर गाडय़ा मध्य रेल्वेवर धावणे शक्य होणार आहे.
 कल्याण ते ठाणे यादरम्यानचा टप्पा मध्य रेल्वेने गेल्या वर्षी पूर्ण केला होता. त्यानंतर लगेचच ठाणे ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या दरम्यानचा टप्पा हाती घेण्यात आला. या मार्गादरम्यान अनेक जुने पूल असून त्याखालून जाणारे रेल्वेमार्ग आणखी खाली घेण्याची आवश्यकता होती. आता या सर्व गोष्टींची खबरदारी घेत हे काम पूर्ण करण्यात आले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हे काम पूर्ण झाल्यानंतर आता याबाबतचा अहवाल आणि सर्व कागदपत्रे मध्य रेल्वेचे रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहेत.
सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या मार्गावरून धावणाऱ्या गाडय़ांचा वेग वाढणार आहे. तसेच उपनगरीय रेल्वेमार्गावर येणाऱ्या नव्या बंबार्डिअर गाडय़ाही मध्य रेल्वेवर धावू शकतील. मुख्य मार्गावरील डीसी-एसी परिवर्तनाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता पुढील सहा ते आठ महिन्यांत हार्बर मार्गावरील कामही पूर्ण होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.