दीपावली पाडव्याच्या मुहूर्तापुरता खोटा आणि फसवा उच्चांकी गूळदर काढून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या पारंपरिक नियोजनाला शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेत गूळ सौदे बंद पाडले. यामुळे दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरील सौद्यांना शुभारंभालाच चुकीच्या परंपरेमुळे गालबोट तर लागले. शिवाय प्रशासक डॉ. महेश कदम यांच्यावर हतबल होण्यासह निर्णयाविना सौद्यातून निघून जाण्याची वेळ आली. बाजार समितीच्या इतिहासात मुहूर्ताचा सौदा बंद पडण्याचा हा पहिलाच प्रकार असून ‘हे नाटक आता थांबवा’ असा संदेश जणू शेतक-यांनी दिला.
अद्याप साखर कारखान्यांचे दर जाहीर झालेले नाहीत. या पाश्र्वभूमीवर या हंगामात सुरुवातीपासून गुळाला दर कमी आहे. गूळ हंगाम सुरू होऊन दीड महिना लोटला आहे. प्रत्येक गूळ हंगामात शुभारंभाचे सौदे किती होतात व या सौद्यात प्रत्येक वेळी उच्चांकी दर कसा काढला जातो. हा संशोधनाचा वेगळा विषय आहे. सोमवारी दिवाळी पाडव्याचा मूहर्ताचा सौदा अनंतराव गरगटे यांच्या दुकानात सुरू झाला. प्रचंड भ्रष्टाचार व बेकायदा नोकर भरतीवरून संचालक मंडळाच्या बरखास्तीमुळे कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक म्हणून आलेले डॉ. कदम यांच्यामार्फत गूळ बोलीस सुरवात झाली.    
प्रशासकांना याचा अनुभव नसला, तरी अनुभवींच्या चुकीच्या मार्गदर्शनाखाली परंपरागत पहिल्या कलमाचा उच्चांकी ५१५१ इतका दर काढला. या दरामुळे शेतकरी भारावले, पण क्षणात सर्वाचा भ्रमनिरास झाला. सलग दुस-या कलमाचा आणि पहिल्याच प्रतिच्या गुळाची ३४०० रुपये इतक्या दराची बोली लागली. त्यामुळे उपस्थित शेतक-यांनी सौद्यात घुसून आक्रमक होत पूर्ण सौदाच बंद पाडला. एकाच प्रतिच्या गुळामध्ये क्षणात १७५० रुपये ढपला पडल्याने शेतक-यांचा संताप अनावर झाला आणि गोंधळास सुरुवात झाली. या वेळी शेतक-यांनी प्रशासकांवर प्रश्नांची सरबत्ती केली. परंतु प्रशासकांना निरुत्तर व्हावे लागले.
दरम्यान, या गदारोळात खरेदीदारांनी नेहमीप्रमाणे काढता पाय घेत न बोलता दूर उभे राहणेच पसंत केले. गदारोळ थांबवून सौदा पूर्ववत होण्यासाठी समितीच्या काही अधिका-यांनी खिंड लढविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आक्रमक शेतक-यांपुढे त्यांचे काहीच चालले नाही. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी हा दर फसवा असून तो आम्हाला मान्य नाही, असे सांगत शुभारंभाचा सौदा शेतक-यांनी बंद पाडला. असा चुकीचा संदेश प्रसारमाध्यमातून जाऊ नये, असे सांगत सौदे सुरू करण्याची विनंती शेतक-यांना केली. परंतु त्यांचेही कुणीही ऐकले नाही. चार हजारच्या वरच दर काढा व ही फसवी पद्धत बंद करा या मागणीवरच शेतकरी ठाम राहिले.
या काळात सक्रिय बनलेल्या भगवान काटेंनी परत एकदा शेतक-यांबरोबर चर्चा केली. यानंतर गरगटे यांच्या दुकानात फेर सौदा काढण्याचे ठरले. सौद्यास सुरुवात झाली व ५१५१ रुपये दर मिळालेल्या कलमास ४५५१ असा ६०० रुपये कमी दर होऊन तिथून पुढे फारसा फरक न पडता पहिल्या प्रमाणेच दर निघाले. फक्त फसवा दर कमी परंतु त्यामुळे शेतक-यांची चार हजारांपेक्षा जास्त दर देण्याची मागणी व्यापा-यांनी हवेतच विरवली. यामुळे प्रशासकीय काळातही इथून पुढे व्यापा-यांचाच वरचष्मा राहणार असल्याची चर्चा शेतक-यांमध्ये तीव्र शब्दात होती. संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासक येऊनही शेतक-यांच्या शेतीमालास हमीभाव मिळेना अशीच चर्चा शेतक-यांच्यात रंगली होती.