किमान गूळ दराबद्दल निश्चिती न झाल्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा मार्केट यार्डातील गूळ सौद्यांची विक्री बंद झाली. गूळ दराबाबत शेतकरी संघटना, गुऱ्हाळधारक संघटना, व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र त्यात एकमत होऊ शकले नाही. सायंकाळी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, उपनिबंधक कार्यालय, पणन कार्यालय यांना निवेदन देवून या प्रश्नी हस्तक्षेपकरून मार्ग काढण्याची मागणी केली.
गूळ दरावरून गेले काही दिवस मार्केट यार्डात सातत्याने गोंधळ होत आहे. गूळ विक्रीचे सौद बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. शनिवारी शेतक ऱ्यांनी विक्री बंद पाडल्यानंतर किमान ३ हजार २०० रुपये दर द्यावा, असे ठरले होते.
सोमवारी मार्केट यार्डातील गूळ सौदे सुरू झाले. वादाची पाश्र्वभूमी असल्याने गूळाची आवकही कमी झाली होती. व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रतिच्या गुळाला ३२०० पेक्षा अधिक दर दिला. तर कमी दराच्या प्रतिला कमी दराची बोली होऊ लागली. त्यावर गूळ उत्पादक शेतकरी संतापले. त्यांनी ३२०० पेक्षा कमी दर काढला जात आहे, अशी विचारणा व्यापारी व बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यातून वाद वाढत गेला. वादावर मार्ग काढण्यासाठी पुन्हा एकदा बैठक झाली. बैठकीस बाजार समितीचे पदाधिकारी, व्यापारी असोसिएशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, गुऱ्हाळधारक संघटना यांनी भाग घेतला. बराच काळ बैठक झाली. मात्र त्यातून तोडगा निघू शकला नाही. गूळ दराचा प्रश्न तापत चालला असून त्याबाबत उद्या काय होणार याची उत्सुकता लागली आहे.