तुफान पाऊस आणि भरतीच्या लाटा यामुळे किनाऱ्यांवरील मृत्यूंसोबत आता महानगरपालिकेला नाल्यातील मृत्यूंचाही प्रश्न भेडसावू लागला आहे. गेल्या महिन्याभरात शहरात विविध ठिकाणी नाल्यात पडून आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दोघांचा शोध सुरू आहे तर दोघे बचावले आहेत. नाल्यांच्या शेजारी राहणाऱ्यांची लहान मुले खेळताना नाल्यात पडण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. पावसाळ्याव्यतिरिक्त नाल्यांमध्ये जास्त पाणी नसते. त्यावेळी नाल्यात पडणाऱ्यांची जीवितहानी फारशी होत नाही. मात्र गेल्या महिन्यापासूनच्या तुफान पावसामुळे पहिल्या आठवडय़ापासूनच नाल्यांमधून मोठय़ाप्रमाणात पाणी वाहू लागले. ६ जून रोजी सुरू झालेल्या पहिल्याच पावसात विक्रोळी येथील पूर्व द्रुतगती मार्गावरून बाइक घसरून दोघे नाल्यात पडले. त्यातील एकाला वाचवण्यात यश आले. १२ जून रोजी भांडूपला सात वर्षांचा मोहंमद शेख पाण्यात वाहून गेला. १२ जून रोजी एकाच दिवशी पवई, मानखुर्द व कांदिवली या तीन ठिकाणी नाल्यात पडून चौघांचा मृत्यू झाला. त्यानंतर याच आठवडय़ात बुधवारी नाल्याशेजारी खेळत असताना दोन वर्षांची मुलगी धारावी येथे नाल्यात पडली. अग्निशमन दल, पोलिस, नौदल तिचा शोध घेत आहेत. मात्र नाल्यातील पाण्याची पातळी आणि वेग यामुळे अद्याप तिचा शोध लागू शकलेला नाही. गुरुवारी दहिसर येथील नाल्यात सात वर्षांचा मुलगा पडला. किनाऱ्यांवरील मृत्यूंपेक्षाही नाल्यातील मृत्यूंची संख्या वाढली असल्याची माहिती पालिकेतील एका अधिकाऱ्याने दिली.

करायला गेले एक..
मलेरिया रुग्णांची संख्या वाढल्यावर डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी तसेच परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी पालिकेने काही वस्त्यांमध्ये गटारांवर लाद्या लावण्याचे काम सुरू केले होते. मात्र गटारे बंदिस्त झाल्यावर या आयत्याच मिळालेल्या जागेवरही झोपडय़ा उभ्या राहिल्या. चांगल्या उपायाचा असा फज्जा उडाल्यावर पालिकेने गटारे झाकण्याचे काम हळूहळू कमी केले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

नाल्यांचे काय करायचे ?
मुंबईत १.५ मीटरपेक्षा रुंद असलेल्या नाल्यांची लांबी २१५ किलोमीटर आहे. तर त्यापेक्षा लहान असलेले नाले १५६ किलोमीटर लांबीचे आहेत. याशिवाय बंदिस्त केलेल्या नाल्या, कमानी, पेटिका यांची लांबी १७४ किलोमीटर आहे. रस्त्याकडेच्या उघडय़ा गटारांची लांबी १९८७ किलोमीटपर्यंत जाते. रस्त्यांच्या मधून जाणाऱ्या, झाकण लावून बंद केलेल्या गटारांची लांबी ५६५ किलोमीटर आहे. झाकण लावून बंद केलेली ही गटारे तसेच काही ठिकाणी बंदिस्त केलेली रस्त्याकडेची गटारे वगळता इतर नाल्यांचे काय करायचे हा पालिकेपुढील प्रश्न आहे. नाले बंद केल्यास त्यांची स्वच्छता राखली जाऊ शकते, मात्र त्याचवेळी त्यांच्यावर अतिक्रमण होण्याचाही धोका संभवतो. पश्चिम द्रुतगती मार्गावर वांद्रे येथे नाल्यावर गोलाकार कमान बसवण्यात आली आहे. त्यापद्धतीचा उपाय करण्याचा पर्यायही पालिकेकडे आहे.

६ जून –   पूर्व द्रुतगती मार्ग, विक्रोळी – वैभव शेषवरे (२४), रघू पदियाची वाचवण्यात यश
१२जून –  भांडूप – मोहम्मंद शेख (७)
२६ जून – रामनगर, गोरेगाव – एकाचा मृत्यू
८ जुलै –   एलबीएस रोड, घाटकोपर- नाल्यात  पडल्यावर वाचवला गेला
१२ जुलै – आंबेडकर उद्यानजवळ, पवई – एकाचा मृत्यू  पीएनजी कालनी, मानखुर्द- दोघांचा मृत्यू  ठाकूर व्हिलेज, कांदिवली- एकाचा मृत्यू
१७ जुलै – धारावी- दोन वर्षांच्या मुलीचा शोध सुरू
१८ जुलै – दहिसर पश्चिम – राजू म्हात्रे (७) शोध सुरू