06 August 2020

News Flash

कविवर्य श्री. दि. इनामदार यांचे निधन

‘घरात आले मेघ येतात, दारी येत इंद्रधनु, हात धरून नेतात मला, त्याला नाही कसे म्हणू श्रावण वेडे कवळे ऊन, फूलपाखरू होऊन येते माझे शब्द फुले होतात, त्यावर पिंगा

| January 3, 2014 01:30 am

‘घरात आले मेघ येतात, दारी येत इंद्रधनु,
हात धरून नेतात मला, त्याला नाही कसे म्हणू
श्रावण वेडे कवळे ऊन, फूलपाखरू होऊन येते
माझे शब्द फुले होतात, त्यावर पिंगा घालून जाते’
अशा शब्दांत स्वत:च्या कवितेची भूमिका सांगणारे श्री. दि. इनामदार यांचे बुधवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्य़ाने त्यांची प्राणज्योत मालवली.
स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये अनेक वर्षे नोकरी करणाऱ्या इनामदार यांची २६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बालगीत, नाटक व कवितांची ही पुस्तके अपूर्व आहेत. शिवगान, फूल फुलता राहिना, मोरपंखात मावेना, नभ मातीच्या कुशीत, दिंडी जाय दिगंतरा, सत्यं वद, गोदावरी हे नाटक, चांदोबा ये रे ये, झुक झुक गाडी ही बालगीते अशी त्यांची ग्रंथसंपदा मोठी आहे. मुक्त कविता लिहिण्याच्या कालखंडात छंद आणि लय सांभाळणारी कविता श्री. दि. सतत लिहीत राहिले. निसर्ग कविता, पुराणातील संकल्पनांना घेऊन लिहिलेली कविता हे ‘श्रीदिं’चे वैशिष्टय़ होते.
लातूर जिल्ह्य़ातील खामगाव येथे निझाम राजवटीत त्यांचे शिक्षण झाले. बँकेचे प्रशासकीय सचिव या पदावरून १९८७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. साहित्य क्षेत्रात नव्याने लिहिणाऱ्यांना श्री. दि. यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. विविध संमेलनांत निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग होता. त्यांनी अनेक संमेलने गाजवली. त्यांच्या अनेक कविता शालेय व महाविद्यालयीन स्तरावर अभ्यासक्रमात समाविष्ट होत्या. शिवगान व महावीर चरित्र याच्या ध्वनिफितीही निघाल्या. रामरक्षेचा भावानुवादही त्यांनी केला. साहित्य सेवा प्रकाशन, कीर्ती प्रकाशन व रजत प्रकाशनाने त्यांची पुस्तके प्रकाशित केली.
संत साहित्य व अध्यात्माच्या ठसा असणाऱ्या त्यांच्या कविता होत्या. लातूर जिल्ह्य़ातील श्री. दि. यांच्या पूर्वजांच्या वाडय़ात सखाराम महाराजांची समाधी आहे. त्यामुळेच कदाचित संत कविता आणि अध्यात्माचा ठसा त्यांच्या कवितांवर उमटत राहिला असावा, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. संत परंपरेत स्वत:ची कविता कोठे आहे, हे तपासणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. ते त्यांच्या कवितेत म्हणतात, ‘कसा मला तेथे वाव मिळणार, माझा अधिकार पायरीचा!’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2014 1:30 am

Web Title: death of poet s d inamdar aurangabad
टॅग Aurangabad
Next Stories
1 लातुरातून आता निवडणूक लढविणार नाही – आवळे
2 आश्रमशाळेचा ताबा अखेर प्रशासनाकडे!
3 दीडशे वर्षांपूर्वीचे घडय़ाळ, १२० देशांची नाणी…
Just Now!
X