उरण-पनवेल रस्त्यावरील जासई नाका ते गव्हाणदरम्यानचा वळण रस्ता यामार्गावरील प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर गेल्या आठवडाभरात दोन जणांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. रस्त्याच्या वळणावर कठडा नसलेला धोकादायक तलाव तसेच तलावात खोल विहीर असा दुहेरी सापळादेखील या मार्गावर आहे. या रस्त्यावर सुरक्षिततेच्या उपायोजना राबवून नागरिकांचे प्राण वाचविण्याची मागणी जासई आणि गव्हाण ग्रामस्थांनी केली आहे.
उरण-पनवेल रस्त्यालगत तीस वर्षांपूर्वी उरणच्या ओएनजीसी प्रकल्पातील सामानाची ने-आण करण्यासाठी तसेच न्हावा येथील ओएनजीसीच्या अरबी समुद्रातील तेल विहिरींवर साहित्य व रसद पोहचविण्यासाठी हा मार्ग तयार करण्यात आलेला होता. ओएनजीसी प्रकल्पानंतर या परिसरात आलेल्या जेएनपीटी बंदरावर आधारित गोदामांची हळूहळू उभारणी झाली आहे. त्यामुळे जेएनपीटी बंदरातून तसेच पनवेल परिसरातून या मार्गावर ये-जा करणाऱ्या जड वाहनांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्यामुळे जासई नाका येथे नेहमीच सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असतानाच या रस्त्यालगत असलेला बिनकठडय़ाचा तलाव तलावातील विहीर तसेच वळणाचा अंदाज न आल्याने होणाऱ्या वाहनांच्या अपघातात वाढ झालेली आहे.
या रस्त्यातून न्हावा, गव्हाण, शेलघर, शिवाजी नगर, तसेच न्हावा खाडी या गावातील नागरिकही ये-जा करीत आहेत. याच मार्गावर मागील आठवडय़ात एका कंटेनर वाहनाने जीपला धडक दिल्याने जीप तलावातील खोल विहिरीत जाऊन कोसळली. तसेच तलावातील पाण्यात वाहनचालकाचा गुदमरून मृत्यू झाला. धोकादायक बनलेल्या तसेच रस्त्यावरील वळणामुळे होणारे अपघात व वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या रस्त्यावरील जड वाहतूक सायंकाळी ५ ते ८ या दरम्यान बंद करण्यात येणार असल्याची माहिती उरण वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिषठ निरीक्षक किशोर जगताप यांनी दिली आहे. हा मार्ग आमच्या हद्दीत येत नसून तो न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केल्याने रस्त्याच्या हद्दीच्या प्रश्नामुळे कोंडी सुटण्याची शक्यता कमी आहे.