रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी प्रबोधनात्मक शिबिरे होत असतानाही वाहतूक नियम सर्रास पायदळी तुडवले जात आहेत. सुरक्षा सप्ताह सुरू असताना तरी वाहतुकीला शिस्त लागेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती; परंतु तसे होताना दिसून येत नाही. दुचाकी, चारचाकी वाहने बेदरकारपणे चालवणे, सिग्नल तोडणे, धावत्या दुचाकीवर मोबाइलवर बोलणाऱ्याची संख्या कमी नाही. तसेच शालेय विद्यार्थी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांमध्ये कोंबाकोंबी सुरूच आहे. शाळा-महाविद्यालय परिसरात विद्यार्थी बेफिकिरीने दुचाकी चालवत आहेत. वाहतूक पोलिसांनी कारवाई करूनदेखील वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१४ पर्यंत तब्बल ३ लाख ४७ हजार ८३५ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ३ कोटी ९२ लाख ३६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
नवी मुंबईमध्ये वाहने पार्किंगसाठी रस्त्याच्या बाजूला सम-विषम पार्किंगचे बोर्ड लावण्यात आले आहेत. रेल्वे स्टेशनमध्ये पे अ‍ॅण्ड पार्कची योजना करण्यात आली असताना वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले आहेत. वाहतुकीच्या नियमांची ऐशीतशी करणाऱ्यांवर वर्षभरात केलेल्या कारवाईमधून ३ कोटी ९२ लाख ३६ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत ही रक्कम १८ लाख ३६ हजार ८०० रुपयांनी अधिक आहे. अवैध प्रवासी वाहतूक, लायसन्स न हाताळणे, नो पार्किंगमध्ये गाडी पार्किंग करणे, इंग्रजी, मराठी फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा वापरणे, विनाहेल्मेट दुचाकी चालवणे आदी नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते; पंरतु वाहनचालक यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर येत आहे. हेल्मेटविषयी मोटार सायकलस्वारांमध्ये मोठय़ा प्रमाणात उदासीनता असल्याचे निदर्शनास आले असून हेल्मेट न घालणाऱ्यांवर वर्षभरात ४६ हजार ९२९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच पार्किंगचे नियम पायदळी तुडवणाऱ्यावर ७३ हजार ५८१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कारला काळ्या काचा लावणाऱ्या ३७५१ जणांवर कारवाई करण्यात आली असून बिगर लायसन्स वाहन चालवणाऱ्या ८३९४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली